शिक्रापुरात ग्रामस्थांचे कचरा बंद आंदोलन सुरु

शिरूर तालुका

कचरा गाड्या कचऱ्यासह ग्रामपंचायत कार्यालयापुढे उभ्या

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी कचरा प्रश्न सुटत नसल्याने कचरा बंद आंदोलन सुरु केलेले असून सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावत असलेल्या ठिकाणी कचरा गाड्या येऊ न देण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने कचरा गाड्या कचरा भरुन चक्क ग्रामपंचायत कार्यालय पुढे उभ्या करण्यात आल्या आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काही केल्या सुटत नसल्याने नागरिक व ग्रामस्थ हवालदिल झाले असताना ग्रामपंचायत कडून वेगवेगळ्या तारखा देण्यात येत असताना नुकतेच मागासवर्गीय समाजाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा बंद आंदोलन सुरु केले आहे.

गावामध्ये कचरा बंद आंदोलन सुरू असल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून कचरा गाड्या देखील बंद झाल्याने नागरिकांना कचरा टाकायचा कोठे, असा प्रश्न पडलेला असताना नागरिक ग्रामपंचायत समोर उभ्या असलेल्या 4 कचरा गाड्यांमध्ये कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत पुढे उभ्या असलेल्या कचरा गाड्यांमध्ये मोठे कचऱ्याचे ढीग दिसू लागले असून येथे कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढून कचरा प्रश्न संपण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहे.

दोन दिवसात प्रश्न मार्गी लागेल: शिवाजी शिंदे

सध्या ग्रामपंचायत कार्यकारिणीची बैठक झालेली असून परिसरात एका ठिकाणी तातडीने कचरा प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे. येत्या 2 दिवसात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.