कान्हूर मेसाईत वृद्ध जोडप्याचे घर गेले वाहून

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळी ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत काही काही शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेल्या, तर काही शेळ्यांचा मृत्यू होऊन एका कुटुंबाचे घर देखील पूर्णपणे वाहून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाउस झाला दरम्यान कान्हूर मेसाई येथील तळोले वस्ती व खर्डे वस्ती येथील तलाव फुटल्याने गावातील गावठाणात पाणी शिरले यावेळी येथील काही घरात पाणी घुसून नागरिकांच्या घरातील साहित्य तसेच एका किराणा दुकानातील साहित्य काही शेतकऱ्यांच्या शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, रात्रीच्या सुमारास पाण्याची पातळी वाढू लागल्याने काही स्थानिक नागरिकांनी ओढ्या लगतच्या घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा दिला.

यावेळी येथील बाबू जयवंत थोरात यांचे राहत असलेले जुने घर घरातील सर्व साहित्यांसह पूर्णपणे पाण्यात वाहून गेले आहे, तर काही नागरिकांच्या गोठ्यात पाणी गेल्याने पाच शेळ्या मृत झाल्या आहे, मात्र रात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने कान्हूर मेसाई येथील तब्बल 25 ते 30 कुटुंबाचे मोठे नुकसान होऊन बाबू जयवंत थोरात यांचे पूर्ण घर सर्व साहित्यांसह वाहून गेले आहे.

तर शिरुरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, मंडलाधिकारी प्रशांत शेटे, कान्हूर मेसाईचे तलाठी अभिजित जोशी, धामारी च्या तलाठी अनुजा घुगे, केंदूरचे तलाठी रमेश घोडे यांनी सदर ठिकाणी भेट देत नागरिकांची चौकशी करत नुकसान झालेल्या लोकांची तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र अनेक कुटुंबांचे नुकसान तसेच एक कुटुंब बेघर होत जनावरांचा देखील मृत्यू झाल्याने शासनाकडून येथील नुकसान ग्रस्तांना मदत मिळणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बाबू थोरात यांच्या मदतीसाठी पुढाकार; शहाजी दळवी

कान्हूर मेसाई ता. शिरुर येथे गावठाणात पाणी आल्याने अनेकांचे मोठे नुकसान होत बाबू थोरात यांचे घर पाण्यात वाहून गेल्याने ते उघड्यावर पडले असल्यामुळे आम्ही गावातील युवकांच्या मदतीने त्यांना पुन्हा आसरा देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शहाजी दळवी यांनी सांगितले.

नागरिकांची व्यवस्था व पंचनामे सुरु; अभिजित जोशी

कान्हूर मेसाई येथील एक घर पूर्णपणे नाहीसे झाले असून पंधरा ते वीस घरांमध्ये सध्या पूर्ण पाणी आहे त्यामुळे त्यांची गावातील मेसाई मंदिर ट्रस्ट येथे राहण्याची तातडीची व्यवस्था करण्यात आलेली असून नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरु असल्याचे तलाठी अभिजित जोशी यांनी सांगितले.