विजयस्तंभ परिसरातील अवैध्य धंदे बंद करा अन्यथा…

शिरूर तालुका

राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात मटका, दारू हे अवैध्य व्यवसाय सुरु असून लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सदर अवैध्य व्यवसायांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सदर अवैध्य धंदे बंद करा अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्यापदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) नजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात अवैध्य मटका, दारु, जुगार सुरु असून येथील अवैध्य धंद्याच्या बाबतीत लोणीकंद पोलीस स्टेशन बघ्याची भूमिका घेत आहेत. यापूर्वी तक्रारी केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाच्या कारवाया करत तक्रार करणाऱ्या तक्रारदारांना पोलीस स्टेशन येथे बोलावून तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याकडून तक्रार दारांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन धमकावण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या अध्यक्षा सिमा पांचाळ यांनी केला आहे.

तसेच सदर अवैध्य धंद्यांवर आठ दिवसात कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय पुणेच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या अध्यक्षा सिमा पांचाळ, शहनाज कुरणे, ज्ञानेश्वर बोराटे, बाळासाहेब जाधव, माया बनसोडे, लक्ष्मण पांचाळ यांनी पुणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन केली आहे.

कोठे ही अवैध्य व्यवसाय ठेवणार नसून कारवाई करणार; गजानन पवार 

विजय स्तंभ परिसरातच नव्हे तर कोठेही अवैध्य व्यवसाय ठेवणार नाही, तक्रारदार पोलीस स्टेशनला आल्यास त्यांच्या समोरच पोलीस पाठवून सर्व अवैध्य धंद्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल करणार असल्याचे लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले.