शिक्रापूरच्या युवकांची मी शिक्रापूरकर ही अनोखी मोहीम

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अनेक युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु करुन सामाजिक कामांना सुरवात करत व्हाट्सअप ग्रुपचा चांगला वापर कसा करता येईल हा संदेश समाजाला देऊन आदर्श निर्माण केला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शंभर हून अधिक युवकांनी एकत्र शिक्रापूर समस्या व उपाय हा व्हाट्सअप ग्रुप तयार करत त्यावर चर्चा करुन गावाच्या विकासासाठी मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु केली आहे.

प्रत्येक रविवारी गावातील विविध कामे करण्याचा संकल्प सदर युवकांनी केला असून त्या माध्यमातून नुकतेच गावातील ब्रिटीश कालीन पुलाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेत पुलावरील झाडी, गवत, कचरा फ्लेक्सचे अतिक्रमण काढून टाकत पुलाची स्वच्छता केली असून लवकरच सदर पुलाची डागडुजी करुन रंग रंगोटी देखील या मोहिमेतून करण्यात येणार आहे.

पुढील काळात शिक्रापूर गावासह वाड्या वस्त्यांवरील शाळा, मंदिरे तसेच जुन्या काळातील वास्तूंचे अशा पद्धतीने जतन करण्याचा निर्णय सदर शिक्रापूर समस्या व उपाय या व्हाट्सअप ग्रुप मधील सर्व सदस्यांनी घेतला आहे. मात्र राजकीय लोकांच्या तसेच प्रशासनाच्या कोणत्याही मदतीविना सर्व कामे युवक व व्हाट्सअप ग्रुप मधील सदस्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे व्हाट्सअपचा सदुपयोग कसा करता येऊ शकतो हे या गावातील युवकांनी करुन दाखवले असल्याने युवकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.