शिरुरच्या महिला दक्षता समितीचे कामच लय भारी…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

पिडीत तरुणी अन् महिलांच्या इथे निवारण होतात तक्रारी…

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशनची हद्द पूर्वेला तांदळी तर पश्चिम दिशेला काठापुर बुद्रुक पर्यंत असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत 52 गावे येतात. तसेच शिरुर ते काठापूर 50 किमी आणि शिरुर ते तांदळी 50 किमी तर शिरुर ते पारगाव पुल 40 किमी अशी संपूर्ण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महिला तसेच युवतींचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असलेली शिरुर पोलिस स्टेशनची महिला दक्षता समिती महिलांचे प्रश्न तर सोडवतच असतात. परंतु त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणुन वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबवत असतात. त्यामुळे महिलांच्या अनेक तक्रारीच इथं निवारण होत असत.

शहरी किंवा ग्रामीण भागातील महिला किंवा महाविद्यालयीन युवती यांना अनेकवेळा छेडछाड किंवा जवळच्याच व्यक्तीकडुन शारीरिक छळ होणे अशा प्रकारास सामोरे जावं लागते. तसेच नवविवाहित मुली घरगुती हिंसाचार किंवा लैंगिक शोषणाच्या बळी ठरतात. रोज समाजात अशा विविध घटना घडत असतात अशा वेळेस आपल्यावर झालेला अन्याय उघडपणे सांगण्यास अनेक महिला किंवा मुली कचरतात. त्यामुळे त्यांना निर्भीडपणे पोलीस ठाण्यात येऊन आपल्या तक्रारी त्यांना मांडता याव्यात. तसेच त्या तक्रारींची तातडीने दखल घेता यावी यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे.

त्यामुळे महिलांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. ही संपूर्ण व्यवस्था विनामूल्य आहे. तसेच येथे पिडीत महिला व मुलींना विनामूल्य सल्ला व मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे महिलांना दक्षता समितीचा मोठा आधार वाटतो. हि महिला समिती प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्यामुळे महिला त्या ठिकाणी येऊन आपली तक्रार मांडत असतात.

शिरुर पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या महिला समितीच्या कार्यकाळामध्ये कमीत कमी 700 ते 800 तक्रारी अर्ज आले होते. त्यातील कमीत कमी 600 अर्जावर दक्षता समितीच्या महिला सदस्यांनी समुपदेशन करुन त्या तक्रारी सोडविल्या. शिरुर महिला दक्षता समिती मध्ये या तक्रारी सोडवण्यात महिला दक्षता समितीच्या जिल्हा समन्वयक शोभना पाचंगे, महिला दक्षता समिती अध्यक्षा- राणी कर्डिले, उपाध्यक्षा शशिकला काळे यांचा मोलाचा वाटा असतो.

तसेच यामध्ये शिरुर पोलिस स्टेशनचे तात्कालिन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, नवनियुक्त पोलिस निरीक्षक संजय जगताप, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, एकनाथ पाटील, महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, सुजाता पाटील, गोपनीय पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे यांचे विशेष सहकार्य मिळत असते. त्याचप्रमाणे महिला दक्षता समिती समितीच्या सदस्या राणी शिंदे, सुवर्णा सोनवणे, श्रुतिका झांबरे, प्रियंका धोत्रे, कविता वाटमारे, ललिता पोळ तसेच इतर सदस्य यांचेही कायम सहकार्य मिळत असते. शिरुर मधील महिला दक्षता समितीच्या चांगल्या कामगिरीमुळे महिलांचा प्रशासनावरचा विश्वास वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.