रत्नागिरीत होणार राज्यस्तरीय शिक्षक मेळावा

शिरूर तालुका

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सुरेश सातपुते यांची माहिती

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा १७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील चंपक मैदान येथे होणार असून या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांसह आदी मंत्री उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात जुन्या पेन्शनचा प्रश्न प्राधान्याने मांडला जाणार आहे तसेच वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी नियमिततेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणे, वैद्यकीय बिलांसाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देणे, केंद्रप्रमुख व तत्समपदे 100 टक्के शिक्षकांतून भरणे, मुख्याध्यापक पदोन्नती करणे, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे यांसह आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली केला जाणार असल्याने शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सहचिटणीस काळाराम चकोर, संपर्कप्रमुख बबन शेलार, विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब लांडगे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी केले आहे.

मेळाव्यासाठी विशेष रजा…

१७ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या शिक्षण परिषद व शिक्षक मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी शासनाने १५ ते १७ फेब्रुवारी अशी विशेष रजा मंजूर करण्यात आलेली असून सदर शिक्षण परिषदेत नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा होणार असल्याचे देखील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी सांगितले आहे.