शिक्रापुरात महिलांची आरोग्य तपासणी व सन्मान

शिरूर तालुका

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रिन्स्टाइन आयुर प्रायव्हेट लिमिटेड व इंद्रायणी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर व महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करत सावित्रींच्या लेकींना सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे प्रिन्स्टाइन आयुर प्रायव्हेट लिमिटेड व इंद्रायणी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने सर्व उपस्थित महिलांची शरीर तपासणी करण्यात आली. यावेळी आयुर्वेद पीएचडी डॉ. प्रवीण बडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची हार्ट अटॅक, हृदय तपासणी, डोळे, पोटांचे विकार, हाडे यांसह तब्बल 40 तपासण्या करण्यात आल्या असून या उपक्रमात सुमारे एकशे वीस महिलांनी सहभाग घेतला होता.

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल भोगवडे यांनी केले तर प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ यांनी केले आणि डॉ. प्रवीण बडे यांनी सर्वांचे आभार मानले.