नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान 

शिरूर तालुका

शिरूर: जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील प्रगतिशील शेतकरी नितीन अर्जुन थोरात यांना पुण्यातील अल्पबचत भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात मंगळवारी प्रदान करण्यात आला.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार दरवर्षी तालुक्यातील एका शेतकऱ्याला दिला जातो. पुरस्काराचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष नाना देवकाते, मुख्याधिकारी आयुष प्रसाद, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे उपस्थित होते.

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष असलेल्या नितीन थोरात यांचे आमदाबाद येथे तीन हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील अवघ्या दहा गुंठ्याच्या शेडनेट हाऊसमध्ये विक्रमी काकडीचे उत्पादन घेतले आहे. याशिवाय शेतात ५०० आंब्याची झाडे, सिताफळ, चिंच, नारळ लागवड करण्यात आली आहे. ऊस, टाॅमेटो, वांगी, हळद, गहू, बाजरी, कांदा आदी पारंपारिक पिकेही दरवर्षी ते घेत असतात. किड नियंत्रणासाठी गंध सापळे, गोबरगॅस, सौर उर्जेवर चालणारे सापळे, शेडनेट हाऊस आदी वेगळे प्रयोग ही त्यांनी आपल्या शेतात केले आहेत. पुरस्कारासाठी या सर्वांची दखल घेण्यात आली.

थोरात यांच्या निवडीने आमदाबाद मधील मधील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. तसेच पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल थोरात यांनी शिरूर पंचायत समितीचे व पुणे जिल्हा परिषदेचे आभार मानले.