पाबळचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय अखेर सुरु

शिरूर तालुका

विविध संघटनांच्या पाठपुराव्याला यश / वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय अनेक दिवसांपासून बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांसह आदी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर प्रशासनाकडून रुग्णालय सुरु करण्याबाबतचा ग्वाही देण्यात आलेली असताना अखेर ग्रामीण रुग्णालय सुरु झाल्याने विविध संघटनांकडून समाधान व्यक्त करत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय संपूर्ण इमारत उभी असून देखील गेली अनेक वर्षांपासून बंद असल्याने यापूर्वी बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तर श्रीमंत बाजीराव मस्तानी प्रतिष्ठान व सहकारी संघटनांनी ठिय्या आंदोलन केल्यावर रुग्णालय 8 फेब्रुवारी रोजी सुरु करण्याची ग्वाही आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. दरम्यान नुकतेच काही संघटनांकडून ग्रामीण रुग्णालय परिसराची स्वच्छता करुन देण्यात आलेली असताना अखेर ग्रामीण रुग्णालयचे पूजन करत रुग्णालय सुरु करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वृषाली राऊत, बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, अश्विनी कदम, आनंदा हजारे, शिरुर तालुका महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी, नवनाथ थोरवे, युवासेंना जिल्हा प्रमुख वैभव ढोकले, सरपंच मारुती शेळके, उपसरपंच स्वप्ना जाधव, सचिन वाबळे, रोहिणी चव्हाण, सुभद्रा गायकवाड, मनीषा चौधरी, छगन चौधरी, भगवान घोडेकर, चंद्रशेखर वारघडे, संजय डहाळे, राज गायकवाड, ओंकार बिरगीकर, दिपाली राऊत, शीतल डांगे यांसह आदी उपस्थित होते.

याबाबत बोलताना सध्या ग्रामीण रुग्णालय हे मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु झालेले असून यापुढील काळात ग्रामीण रुग्णालयसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक होई पर्यंत आम्ही शासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांनी सांगितले.

सध्या पाबळ ग्रामीण रुग्णालय मोजक्या कर्मचाऱ्यांच्या नेमणूकीमध्ये ठराविक वेळत बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आलेले असून नियमित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर पूर्णवेळ सुरु करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वृषाली राऊत यांनी सांगितले.