आई-वडील शेतात अन मुल बैलगाडा घाटात ग्रामीण भागातील चित्र…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (सुनिल जिते) ग्रामीण भागात सध्या बैलगाडा हंगाम सुरु झाला असून कुटुंबातील आई-वडील शेतीच्या कामात, तर मुले बैलगाडा घाटात असे चित्र दिसून येत आहे. तसेच गावोगावी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धाना लाखो रुपयाची बक्षिसे ठेवली जात असल्याने शाळेला दांडी मारुन विद्यार्थी क्रिकेटस्पर्धेत भाग घेत आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

शिरुर तालुक्यात गावोगावी बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी, तसेच बैलगाडा शर्यतीमध्ये बैल धरण्यासाठी, अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थ्यांसह तरुण पिढी गुंतल्याचे दिसून येत आहे. परीक्षेचा हंगाम जवळ आला असताना तरुण पिढी बैलगाडा शर्यतीच्या घाटातच मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. गावोगावच्या यात्रांमध्ये ऑर्केस्ट्रा, तमाशामध्ये देखील तरुण पिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.

 

सध्या काही गावांमध्ये राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपये बक्षीस असणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धा आयोजित करत असताना शाळकरी विद्यार्थ्यांसह तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक तरुण खेळाडू पाहावयास मिळतात. तर प्रेक्षक म्हणूनही तरुण पहावयास मिळत आहेत. त्यामुळे विद्यार्थी तसेच तरुणांचे नुकसान होत आहे.

 

सध्या नोकरी मिळण्याचे कमी झालेले प्रमाण, व्यवसायात आलेली मंदी, शेतमालाला नसलेले बाजार भाव यामुळे अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत आलेली असताना तरुणांनी रोजगार निर्मिती आणि रोजगार मिळवण्याऐवजी स्वत:ला इतर ठिकाणी गुंतवून घेतल्याचे दिसत आहे. आधीच मोबाईलमुळे मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीच्या वेळेचा अपव्यय होत असताना आणखी वेळही तरुण पिढी वाया घालवत असेल तर भविष्यात त्यांचे कुटुंब तसेच समाजाला मोठ्या प्रमाणावर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये तरुणांनी सर्वच गोष्टींचा विचार करून पुढे जाणे गरजेचे बनले असल्याची भावना जाणकार व तज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.