रांजणगावचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण आणि पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना बहिर्जी नाईक पुरस्कार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीचा खून करुन आरोपी घटनास्थळावरुन पळुन गेला होता. तसेच हा आरोपी खून केल्यानंतर मिळेल तेथे मजुर अड्ड्यांवर काम करत होता. तसेच तो मोबाईल वापरत नसल्याने आरोपीचा शोध घेण्याचे रांजणगाव पोलीसांसमोर मोठे अव्हान निर्माण झाले होते. त्यावेळेस पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी वेषांतर करत हडपसर येथील मजुर अड्डयावर मजुर म्हणुन काम करुन शिताफिने आरोपीस अटक केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण आणि उमेश कुतवळ यांना आज (दि 15) रोजी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन च्या हद्दीत वामन बबन चौघुले (रा.जवळा, ता. पारनेर, जि.अहमदनगर) या व्यक्तीने विठ्ठल केशव शेळके याच्या डोक्यात सिमेंटचा ठोकळा टाकुन त्याचा खून करुन तो घटनास्थळावरुन पळुन गेला होता. परंतु सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी वामन चौघुले हा मिळेल तेथे मजुर अड्ड्यांवर काम करणारा कामगार होता. तो मोबाईल वापरत नव्हता. तसेच मागील दहा पंधरा वर्षापासुन त्याच्या पत्नीपासुन विभक्त राहत असल्याने तो त्याचे मुळगावी देखील जात नव्हता अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आरोपीचा शोध घेण्याचे पोलीसांसमोर मोठे अव्हान निर्माण झाले होते.

सदर आरोपी हा कामगार असुन तो हडपसर परिसरामध्ये कामगार अड्यावर फिरत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त होताच तपास पथकाने सदर परिसरात आरोपीचा सीसीटिव्हि फुटेजच्या आधारे शोध घेतला. पंरतु तरीसुद्धा सदर आरोपी मिळुन येत नसल्याने पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी एक नामी शक्कल लढवत हडपसर येथील मजुर अड्यावर दोन दिवस मजुर बनुन काम पाहिजे असे सांगुन मजुर अड्यावर सकाळ, संध्याकाळ थांबुन राहिले. तेथील मजुरांशी ओळख करुन त्यांचा विश्वास संपादन करत आरोपी वामन चौघुले हा काम करत असलेल्या दोन-तीन ठिकाणांची व ठेकेदारांची माहिती काढुन त्यांच्याकडे तपास करुन आरोपीस हडपसर पुणे परिसरातुन ताब्यात घेवुन अटक केली होती.

 

या कामगिरीमुळे रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक महेश ढवाण आणि पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.