शिक्रापुरातील निषेध सभेतील आयोजकांवर कारवाईची मागणी

शिरूर तालुका

समाज बांधवांचे शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना निवेदन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सरपंच रमेश गडदे यांना मारहाण झाल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे काही युवकांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांचा तपास व कारवाई चालू असताना देखील निषेध सभा आयोजित करुन समाजामध्ये वैरभाव करणाऱ्या निषेध सभेच्या आयोजक व वक्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी काही समाज बांधवानी केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सरपंच रमेश गडदे यांना १९ नोव्हेंबर रोजी मारहाण झाली. याबाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी तपास सुरु करत कारवाई सुरु केली. मात्र रमेश गडदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी समाज माध्यमामध्ये अनावश्यक प्रसिद्धी केली. त्यानंतर काही नागरिकांनी निषेध सभा घेतली. मात्र विनापरवानगी निषेध सभा घेतली असल्यास सदर आयोजक व वक्ते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवृत्त पोलीस अधिकारी अरुण सोंडे, प्रकाश तुळशीराम सोंडे, प्रकाश आबुराव सोंडे, विठ्ठल सोंडे, निलेश उबाळे, राज जाधव, आकाश जाधव, साहिल सोंडे यांसह आदीं मागासवर्गीय समाजाच्या समाज बांधवांनी शिक्रापूर पोलिसांना निवेदन देत केली आहे.

सदर घटनेबाबत काही कार्यवाही करत असताना समाज बांधवांना कल्पना दिली जात नाही, त्यामुळे निषेध सभेचे आयोजक एखादी घटना घडवून आणू शकतात त्यामुळे आयोजकांकडून शांतता भंग करणार नाही असे बंधपत्र लिहून घेण्यात यावे तसेच मागासवर्गीय वस्तीमध्ये पोलीस गस्त ठेवण्यात यावी व बंधपत्र होई पर्यंत संबंधितांना मागासवर्गीय वस्तीत फिरू नये अशी समज देण्याची देखील मागणी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याकडे निवेदन देत करण्यात आली आहे.