शिरुर तालुक्यात बांदलांचा लागेना मेळ, मांढरेंचा कळेना खेळ…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

जिजामाता बँकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय रंग, मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे रिंगणात

शिक्रापूर (शेरखान शेख): जिजामाता महिला सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक सध्या जाहीर झालेली असताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल व बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने बांदलांचा लागेना मेळ मांढरेंचा कळेना खेळ, अशी स्थिती निर्माण होत जिजामाता बँकेच्या निवडणुकीला राजकीय रंग आला आहे.

जिजामाता महिला सहकारी बँकेच्या तेरा संचालक पदांसाठी १५ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे, बँकेच्या बारा शाखा असून शिरुर तालुक्यात शिक्रापूर, शिरुर व मांडवगण फराटा येथे अशा तीन शाखा असून शिरुर तालुक्यात सहा हजार पाचशे मतदार आहेत, तर निवडीतील तेरा पैकी आठ जागा महिला संचालकांच्या आहेत. सदर बँकेच्या निवडणुकीत मागील पंचवार्षिक मध्ये आमदार अशोक पवार यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या माजी जिल्हा परिषद सदस्या शेखर पाचुंदकर यांनी अर्ज मागे घेतल्याने तसेच जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर हे खुल्या गटातून बिनविरोध निवडून आले होते.

सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली असताना सुजाता पवार या निवडणुकीच्या रिंगणात नाही. मात्र अशोक पवार यांचे शिरुर तालुक्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले नुकतेच कारागृहातून बाहेर पडलेले जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर करताच प्रथम जिजामाता बँकेच्या निवडणुकीत स्वतः सह पत्नी रेखा बांदल यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे,

तर आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक असून हि सध्या अशोक पवार यांच्याबाबत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे तसेच मंगलदास बांदल यांचे जुने सहकारी मित्र असलेले आबाराजे मांढरे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला असताना अशोक पवार याचे खंदे समर्थक असलेले बँकेचे विद्यमान संचालक जाकिरखान पठाण, तर माजी संचालक पंडित दरेकर यांचे बंधू उत्तम दरेकर या दोघांनी तसेच अशोक पवार यांचे कट्टर विरोधक काकासाहेब खळदकर यांनी त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना शिरुर तालुक्यात आता कसा राजकीय रंग भरला जाणार याकडे संपूर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.