Mathadi

माथाडीच्या नावाखाली बोगस पैसे उकळल्यास कायदेशीर कारवाई: उद्योगमंत्री

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): माथाडी कायद्याप्रमाणे जे खरोखरच माथाडी आहेत. त्यांना न्याय देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून, माथाडी कामगारांवर अन्याय होऊ नये. तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये यासाठी सरकार काळजी घेत आहे. परंतु, माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे उकळणे ही चुकीची प्रवृत्ती असून जर माथाडीच्या नावाखाली माथाडीशी कसलाही संबंध नसलेल्या संघटना दादागिरी करत असतील तर त्यांच्यावर FIR दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या देऊन राष्ट्रवादीचे काही बडे नेते आणि त्यांचे बगलबच्चे बेकायदेशीररित्या पैसे उकळत असल्याची तक्रार शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. त्याच अनुषंगाने उद्योगमंत्री सावंत यांनी माथाडी बाबत सुचक विधान केले आहे.

रांजणगाव एमआयडीसी येथे रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA) च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत रांजणगाव औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या अनेक समस्यांबाबत उद्योगमंत्री यांनी रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी तसेच कंपन्यांचे पदाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल काशीद व मान्यवर उपस्थित होते.