शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या अनोसेवाडीमध्ये वर्षानुवर्षे अंधाराच्या छायेत राहिलेल्या स्थानिक ग्रामस्थांना अखेर उजेडाची पहाट झाली आहे. करडे येथील इलेक्ट्रिकल गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आर बी जगदाळे पाटील यांच्या पुढाकारातून वाडीत नव्याने पथदिवे बसवण्यात आले असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी अनोसेवाडीच्या ‘लाडक्या’ बहिणींनी आर बी जगदाळे पाटलांनी दिलेली भेट आमच्यासाठी ‘लाख’ मोलाची असल्याचे ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.
अनोसेवाडीतील मुख्य रस्ता आणि उपरस्ते या ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबावर पथदिवे नसल्यामुळे अनेक वर्षे हे रस्ते अंधारात बुडाले होते. रात्रीच्या वेळी महिलांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना अंधारामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. साप-विंचू, भटक्या प्राण्यांचा धोका,चोरीच्या घटना त्यातच अलीकडच्या काळात बिबट्याचा वाढलेला वावर यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेकदा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी करुनही प्रश्न प्रलंबितच राहिला होता.
View this post on Instagram
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर बी जगदाळे पाटील हे प्रचारानिमित्त अनोसेवाडीत आलेले असताना स्थानिक ग्रामस्थांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. त्यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत वाडीत जवळपास 25 अत्याधुनिक एलईडी पथदिवे बसवून दिले. काही दिवसांतच संपूर्ण परिसर उजळून निघाला.
त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्ते प्रकाशमान झाल्याने ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, महिलांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे. “वर्षानुवर्षे आम्ही अंधारात जगत होतो. आमच्या ‘लाडक्या’ भावाने दिलेली ही भेट आमच्यासाठी लाख मोलाची आहे,” अशा शब्दांत स्थानिक महिलांनी भावना व्यक्त केल्या. या पथदिव्यांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होत असून, रात्री उशिरा घरी परतताना आता भीती वाटत नाही. किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना संध्याकाळी उशिरापर्यंत दुकान सुरु ठेवणे शक्य झाले आहे.
अनोसेवाडी ग्रामस्थांच्या वतीने नुकताच करडे येथील इलेक्ट्रिकल गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आर बी जगदाळे पाटील यांनी स्वखर्चाने वाडीत जवळपास 25 अत्याधुनिक एलईडी पथदिवे बसविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील सर्व महिला भगिनींनी आर बी जगदाळे पाटील यांचे आभार मानले. अनोसेवाडीतील हा बदल इतर वाड्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची चर्चा गावात रंगली आहे.
Video: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं…
शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…
शिरूर तालुक्यात बेट भागात चोरट्यांचा उच्छाद; चार दिवसांत पाच रोहित्र फोडले