टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

राजकीय शिरूर तालुका

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे.

अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून कार्यकर्ते तयारीत आहेत. वाढदिवस, लग्न समारंभ, दशक्रिया अशा सगळ्याच कार्यक्रमांना हजेरी लावून कार्यकर्ते स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेचे दावेदार फक्त आम्हीच अशा प्रकारे जनतेवर राज्य करू पाहणारे प्रत्येक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाल्याच्या आविर्भावात वागत आहेत. स्वतःची प्रसिध्दी स्वतः करून घेण्यासाठी प्रत्येक घडामोडींची सोशल मीडिया द्वारे प्रसिध्दी केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परीषद सदस्य पदासाठी सुनिता गावडे, राजेंद्र गावडे, दामुशेठ घोडे, भाजपाकडून सावित्राशेठ थोरात, शिवसेनेकडून डॉ. सुभाष पोकळे, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे या चारही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून, जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहे. पंचायत समिती सदस्य पदासाठी फोडाफोडीचे तसेच उमेदवारावर माघार घेण्यासाठी दबाव आणू शकतात या कारणाने नावे गुपित ठेवली जात आहे. त्यामुळे या गटात राजकिय वातावरण चांगलेच तापले असून आता चौरंगी लढत होणार का? तसेच या चौरंगी लढतीमुळे मतदारांपुढे डोकेदुखी वाढणार असून मते कोणाच्या पारडयात जाणार याकडे लक्ष लागणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अनेक जण इच्छुक असून कोणाला उमेदवारी मिळणार, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी होणार का? हे आता येणारा काळच ठरवणार आहे