शिरुर तालुक्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

शिरूर तालुका

शिक्रापुरातील आढावा बैठकीतून वरिष्ठ नेते मार्गदर्शनाविनाच गेले निघून

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असताना तालुक्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने मार्गदर्शनासाठी आलेले पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन न करताच बैठकीतून निघून गेल्याने चर्चेला उधान आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना नेत्या जयश्री पलांडे यांच्या फार्म हाउस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी माजी मंत्री व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर, समन्वयक रवींद्र मिर्लेकर, महिला जिल्हाप्रमुख श्रद्धा कदम, जिल्हाध्यक्ष माऊली कटके, जिल्हा सल्लागार विजया टेमगिरे, जिल्हा संघटक संजय देशमुख, समन्वयक मच्छिंद्र गदादे, तालुकाध्यक्ष पोपट शेलार, महिला तालुकाध्यक्षा चेतना ढमढेरे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे, युवा सेना तालुकाध्यक्ष विजय लोखंडे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ, उपतालुका प्रमुख अनिल पवार, माजी तालुकाध्यक्ष अनिल कोल्हे, सुधीर फराटे, अमोल हरगुडे, दादा वाजे, नाना गिलबिले, सचिन मोरे, कैलास भोसले, संगीता शिंदे, स्वाती बोरकर यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आढावा बैठकीत चर्चा सुरु असताना अनेक पदाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावरील वरिष्ठ पदाधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाही, कोणत्याही मिटिंग अथवा नियोजन बाबत माहिती देत नाही, कार्यक्रम पत्रिका तसेच पोस्टरवरील नावांवरुन वारंवार त्रास दिला जातो. पदाधिकारी इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनातून फिरतात, निवडणुकांमध्ये विरोधात कामे केली जातात यांसह वरिष्ठ पदाधिकारी आल्यानंतर त्यांच्या समोर कार्यकर्ते व पदाधिकारी आदी तक्रारी केल्या.

दरम्यान तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांमध्ये काही गोंधळ झाल्याने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आढावा घेण्यासाठी आलेले माजी मंत्री व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर हे सदर बैठकीतून उठून गेले त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला त्यामुळे जयश्री पलांडे यांचे मार्गदर्शन होऊन कार्यक्रम संपवण्यात आला.

दरम्यान यावेळी समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश घोगरे यांसह आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र घडलेल्या प्रकारामुळे शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून तालुक्यात चर्चा रंगली आहे.

शिक्रापूर येथे बैठकीला सुरुवात करताना पक्षवाढ करताना पक्षामध्ये काम करणारे शिवसैनिक घ्या कामाला लावणारे नकोत असा सल्ला देखील माजी मंत्री व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.