शिक्रापुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गायकवाड यांना सामाजिक कृतज्ञता 2023 पुरस्कार

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) महाराष्ट्र साहित्य दर्पण आयोजित जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तसेच कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथील महसुल सेवा प्रबोधिनी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिक्रापुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गायकवाड यांना सामाजिक कृतज्ञता 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तसेच कृतज्ञता पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे,विलास ठोसर, प्रा डॉ शैलेंद्र भणगे, राजेश्री शिवशाही समुहाचे संस्थापक-अध्यक्ष गणेश चव्हाण, सुप्रसिद्ध कवी सचिन शिंदे, प्रकाश पाठक, चित्रपट दिग्दर्शक अर्जुन नाटके, लक्ष्मण खटिंग आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याऱ्यातुन आलेल्या अनेक मान्यवरांना सामाजिक कृतज्ञता 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिक्रापुर येथील सुरेखा गायकवाड गेल्या पाच वर्षांपासुन सामाजिक काम करत असुन शिरुर तालुक्यातील महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्या कायमच प्रयत्नशील असतात. रांजणगाव एमआयडीसी येथील अंतर्गत पथदिवे बंद असल्यामुळे महिलांची छेडछाड होत असल्यामुळे त्यांनी काही दिवसांपुर्वी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत साडी-चोळीचा आहेर भेट म्हणुन दिला होता. त्यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेत नुकताच त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक कृतज्ञता 2023 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.