करंदी ग्रामपंचायतचा पुन्हा एकदा अजब ठराव

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी चुकीच्या पद्धतीने काही ठराव घेतलेले असताना त्याबाबतची चौकशी सुरु असताना आता पुन्हा करंदी ग्रामपंचायतने सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र असल्याशिवाय कोणाला देणगी अथवा लोकवर्गणी देऊ नये, असा अजब ठराव घेतल्याचे समोर आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी ग्रामसभेत काही वेगळे ठराव घेतल्याने त्याबाबत काही तक्रारी झालेल्या आहेत तर अनेकदा ग्रामपंचायतचे ठराव देखील वादग्रस्त ठरलेले आहे. परंतु गावातील अंतर्गत राजकारणामध्ये ग्रामपंचायत भरडली जाण्याचे प्रकार आज देखील सुरु आहे.

सध्या ग्रामपंचायतने हद्दीतील काही कंपन्यांना नोटीस दिलेले असून मासिक मिटिंग मध्ये ठराव झालेला असून त्यानुसार कंपन्यांनी गावातील कोणत्याच व्यक्तीस, मंडळास, देवस्थानास तसेच संस्थेस लोकवर्गणी देताना सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र व ठराव असल्याशिवाय देगणी देऊ नये असे ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे व सरपंच सोनाली ढोकले यांच्या सहीचे नोटीस दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पोलीस अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत सदर बाब काही कंपन्यांच्या प्रतीनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचे चालले तरी काय असा प्रश्न कंपन्यांच्या प्रतिनिधींना पडला आहे.

सदर पत्राबाबत चौकशी केली जाईल; अजित देसाई

करंदी ग्रामपंचायतने काही कंपन्यांना दिलेल्या पत्राची माहिती आम्हाला मिळालेली असून त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी सांगितले.