शिरुर शहरात दोषी आढळून येणाऱ्या खाजगी शाळांवर तात्काळ कठोर कारवाई करा; नाथा पाचर्णे

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील खाजगी शाळांचा नियमबाह्य कारभार आणि पालकांची आर्थिक लूट करून नफेखोरी करणाऱ्या दहा खाजगी शाळांच्या विरोधात भारतीय बहुजन पालक संघ गेल्या अडीच वर्षांपासून सतत पाठपुरावा करत असुन याच अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी शिरुर शहरातील दहा खाजगी शाळांची सहा महिन्यांपूर्वी समिती नेमून 12 (क) नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत शाळांचे गैरव्यवहार आणि गैरकारभार स्पष्टपणे उघड झाले आहेत. त्यामुळे सदर दोषी आढळून येणाऱ्या शाळांवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करून हजारो पालकांना न्याय द्यावा अशी मागणी नाथा पाचर्णे यांनी केली आहे.

सदर सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग कडून 17 फेब्रुवारी 2023 ला पाच सदस्यांची समिती नेमली गेली. त्यानंतर त्यात सुधारणा करून 29 मे 2023 रोजी सुधारित 10 सदस्यांची समिती नेमून मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्या अन्वये 12 (ख) नुसार प्रत्यक्षात चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशी मध्ये दोषी आढळून येणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणे, शाळांवर शासन प्रशासक नेमणूक करणे,शाळांना आर्थिक दंड करून संबंधित दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. शिरुर शहर व परिसरातील दहा खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेणारे 15 ते 20 हजार विद्यार्थ्यांशी हा प्रश्न निगडित आहे.

शिरुर येथील खाजगी शाळांकडून भरमसाठ आणि नियमबाह्य पद्धतीने फी आकारणी करून एका प्रकारे कोट्यावधी रुपयांची लूट सुरू आहे. शुल्क आकारणी बाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे एकही शाळा पालन करत नाही. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यांचे दाखले, निकालपत्र अडवून ठेवली जात आहेत. तसेच शैक्षणिक गुणवत्ता नसल्याने एकाबाजूला पालकांना होत असलेला मनस्ताप आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधाकारात जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

सर्व पालकांनी आपल्या सदर खाजगी शाळांकडून सद्यस्थितीत काही त्रास दिला जात असेल, अडवणूक केली असेल, फी वसुलीसाठी दबाव टाकला जात असेल किंवा पाल्यास किंवा पालकांस मानसिक त्रास दिला जात असेल तर तर निर्भिडपणे चौकशी समिती (पंचायत समिती,शिक्षण विभाग, शिरुर) कडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. त्यामुळे दोषी शाळांवर कारवाई करण्यास मदत होईल आणि हजारो पालकांचे होणारे शोषण थांबवता येईल असे आवाहन भारतीय बहुजन पालक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन व शिक्षण संचालक यांनी सदर दोषी आढळून येणाऱ्या शाळांवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करून हजारो पालकांना न्याय द्यावा अशी मागणी शिरुरच्या हजारो पालकांच्या वतीने करण्यात येत असल्याचे भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथा पाचर्णे यांनी सांगितले. यावेळी फिरोझ सय्यद,सागर घोलप,अशोक गुळादे उपस्थित होते.