जातेगावच्या शेतकऱ्याला शासनाकडून मिळालेला सौर पंप चोरी

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळालेला सौर उर्जेवर चालणारा सौर पंप चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील विजय खैरे यांना शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी सौर उर्जेवर चालणारा सौर पंप मिळालेला होता. सदर पंप खैरे यांनी त्यांच्या शेतीवरील विहिरीमध्ये बसवलेला होता. २१ फेब्रुवारी रोजी शेतातील कामे करुन खैरे घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरपंप चालू करण्यासाठी विहिरीकडे केले असता विहिरीवर असलेला शासनाच्या कुसुम योजनेतून मिळालेला सौरपंप चोरीला गेल्याचे खैरे यांच्या निदर्शनास आले.

याबाबत विजय जयवंत खैरे (वय ४५) रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.