‘तो’ आधिकारी घेतोय एसीची थंडगार हवा, शेतकऱ्यांना मात्र देतोय चांगलीच सजा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक सध्या नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारणही तसंच! कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने एसी लावून अधिकारी थंडगार हवेत मजा मारताना दिसत असून, दुसरीकडे आपल्या अडचणी घेऊन आलेले शेतकरी तासन्‌तास दरवाजाबाहेर ताटकळत उभे राहत आहेत.

एकीकडे हवामान तापमानाची मर्यादा पार करत आहे, शेतकरी घाम गाळत आपली कामे करून सरकारी दारात मदतीच्या अपेक्षेने येत आहेत, तर दुसरीकडे हा अधिकारी मात्र दार बंद करून एसीच्या गारव्यात ऐषारामात बसलेला आढळून येत आहे. यामुळे शासनाच्या “शासन आपल्या दारी” या घोषणेला सरळ थट्टेचा भाग बनवले गेले आहे.

याच कार्यालयात चार झिरो कर्मचाऱ्यांवर अवलंबून कामकाज सुरू असल्याने अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित असून, आर्थिक तडजोड होणारी प्रकरणी तात्काळ मार्गी लावली जातात.सामान्य नागरिकांना कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच, तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात एसी बसवणे ही शासकीय गैरप्रकारात,शिस्तभंगाची गणली जाणारी कृती असून, अनधिकृतपणे लावलेला एसी आणि त्याच्या विजेचा खर्च अधिकाऱ्याकडून वसूल केला जाऊ शकतो.संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध त्याविरोधात चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे.शेतकरी संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “शासकीय नोकरशाही गरिबांच्या व्यथा ऐकण्याऐवजी गारव्यात झोपा घेत असेल, तर या शासनाचा उपयोग काय?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी करत आहेत. अन्यथा जनआंदोलन उभे करण्याचा इशारा देखील देण्यात येत आहे.जर भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी स्वतःच्या सोयीसाठी एसी लावतो आणि कार्यालयीन खर्चावर तो चालवतो, तर तो सरकारी मालमत्तेचा वीजेचा गैरवापर असून त्यावर मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होऊ शकते. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज व मनसेचे अविनाश घोगरे यांनी दिली आहे.