Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात चालणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशावर शिरुर महसुल विभागाने पुन्हा एकदा कारवाई करत एक वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट आणि वाळू वाहून नेणारी फायबर बोट जिलेटीनच्या साह्याने उध्वस्त केली. गेल्या सहा महिन्यातली महसुल विभागाची हि चौथी कारवाई असुन घोड धरणात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीचा बुधवार (दि १२) रोजी चक्काचूर केला.

घोड पाटबंधारे तसेच महसुल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासुन घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीच्या वेळी यांत्रिक बोटींच्या साह्याने अवैधरीत्या वाळु उपसा सुरु आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेकवेळा शिरुरच्या महसूल विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. महसूलच्या अधिकाऱ्यांनी सहा महिन्यात तीन वेळा कारवाई करत यांत्रिक बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडल्या आहेत.

बुधवार (दि १२) रोजी सकाळी ११ च्या सुमारास घोड पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता वैभव काळे तसेच मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांच्या पथकाने हि संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ग्राममहसूल कर्मचारी राजु बढे, हर्षद साबळे, रुपेश शेटे, श्रीकांत आढाव, कोतवाल बाळासाहेब बुलाखे, काका कुसेकर, घोड पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दादासाहेब पवार यांनी सहभाग नोंदवला.

तीन वेळा कारवाई तरीही वाळू उपसा सुरुच…

घोड धरणात गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या यांत्रिक बोटींच्या साह्याने वाळू उपसा सुरु आहे. चिंचणी, गुनाट, निमोणे या तीन गावच्या हद्दीतुन वाळूची तस्करी केली जाते. परंतु या तीनही गावचे पोलिस पाटील तसेच सरपंच हा सगळा सावळा गोंधळ उघड्या डोळ्याने पाहत आहेत. परंतु या बेकायदेशीर वाळूची वाहतुक रोखण्यासाठी मात्र या तीनही गावच्या ग्रामपंचायत किंवा पोलिस पाटलांकडुन काय उपाययोजना करण्यात आल्या हे एक न उलगडणार कोडं आहे.

वाळू माफीयांना राजकीय अभय…?

घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असुन भविष्यात मोठी पाणीटंचाई निर्माण होऊन त्याचा थेट परिणाम शेतीवर होणार आहे. परंतु या याच भागातील काही स्वयंघोषित राजकीय नेते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या वाळू माफियांना राजकीय पाठबळ देत असल्यामुळे वाळू माफिया मुजोर झाले आहेत. त्यामुळे महसूल तसेच पोलिस प्रशासनाला वाळू माफिया जुमानत नसल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. (क्रमश:) 

शिरुर; रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टला ‘ब’ वर्ग दर्जा; फटाके वाजवत आनंदोत्सव

Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला