वढू बुद्रुकला बिबट्यांच्या पिलांच्या अफवेने खळबळ; काय आहे पाहा…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे गेली दोन वर्षात अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले असताना शुक्रवारी (ता. १) सकाळच्या सुमारास येथील शेतात काम करणाऱ्या नागरिकांना बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील आदित्य भंडारे यांच्या उसाच्या शेतात काही नागरिक काम करत असताना त्यांना बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले दिसून आली. दरम्यान येथील सर्व नागरिक घाबरून गेले. याबाबतची माहिती वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुका सचिव शेरखान शेख यांना मिळताच शिरुर वनविभागाचे वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता तेथे शेतात आढळून आलेली पिल्ले बिबट्याची नसून रानमांजराची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

परंतु, गावामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे आणि काही नागरिकांवर बिबट्याचे हल्ले केलेले असल्याने आम्ही घाबरून गेल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

वढू बुद्रुक येथे आढळून आलेल्या पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले असून, नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन वनरक्षक बबन दहातोंडे यांनी केले आहे.

unique international school