शिरुर तालुक्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या युवकाचा नदीत ढकलून खून…

क्राईम मुख्य बातम्या

आरोपीला चोवीस तासात अटक

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील न्हावरे येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आणि या अनैतिक संबंधाबाबत इतरांना सांगेल असे म्हणत वारंवार पैशाची मागणी करुन पैसे उकळत असणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाला मुळा-मुठा नदीच्या पुलावर घेऊन जात नदीवरून ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली असुन यात नाना ऊर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने या युवकाचा खून झाला असुन याबाबत बबलू उर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर या खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. हि खुनाची घटना घडल्यानंतर शिरुर पोलिसांनी 24 तासातच आरोपीला अटक केली असल्यामुळे “शिरुर पोलिस” ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्हावरे गावातील निंबाळकरवस्ती येथे राहणाऱ्या बबलू उर्फ रविराज याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. हे मयत युवक विठ्ठल आण्णा कीर्तने याला माहीत असल्याने तो बबलूला वारंवार पैशाची मागणी करुन पैसे उकळत होता. तसेच मी महिलेसोबत पोलिसात जाऊन तुझ्यावर बलात्काराची केस करेल अशी धमकी देत होता. त्यामुळे आरोपी या धमकीला त्रासला असल्याने बबलू याने (दि 24) मे रोजी बबलूने विठ्ठलला स्वतःच्या एम एच 12 एस पी 3924 या दुचाकी गाडीवर बसवून मुळा मुठा नदीच्या पुलावर घेऊन गेला आणि त्याला पाण्यात ढकलून त्याचा खून केला.

या घटनेत नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने (वय १९) रा. न्हावरा कारखाना (ता. शिरुर), जि. पुणे मुळ (रा. कीर्तनवाडी खरवंती ता. पाथर्डी जि. अहमदनगर) याचा मृत्यू झाला आहे. मात्र सदर प्रकारानंतर नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने हा युवक बेपत्ता झाल्याने प्रथम शिरूर पोलीस स्टेशन येथे नाना बेपत्ता झाल्याची खबर नोंदविण्यात आली होती. मात्र त्याचा मृतदेह मुळा मुठा नदीमध्ये सापडल्यानंतर शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सखोल तपास केला असता घडलेला प्रकार समोर आला.

याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ शंकर चव्हाण (वय 56) रा. न्हावरा (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी बबलू उर्फ रविराज ज्ञानदेव निंबाळकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव हे करत आहेत.