तालुक्यात तहसिलदारांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा…

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील रस्त्याबाबत तहसीलदारांनी मनाई आदेश दिलेले असताना देखील एका कंपनीच्या मालकाने तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आदेशाचे उल्लंघन केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय ढाका या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील काही इसमाच्या जमिनी विजय लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड कंपनीसाठी करारावर घेतलेल्या आहेत. मात्र त्यांनतर कंपनीच्या वतीने तेथे शेजारील शेतकऱ्यांच्या बांधावर झाडे तोडत रस्त्यावर अडथळा करण्यात आले.

त्यामुळे येथील रामदास कळमकर, रंजना खामकर व महेश पिंगळे यांनी याबाबत शिरुर तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर शिरुरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी येथील रस्त्यावर अडथळा निर्माण न करता रस्ता खुला ठेवावा, असे आदेश दिलेले होते. मात्र त्यांनतर विजय ढाका यांनी रस्त्याचे कडेला चारी खोदत, झाडे तोडून, मुरूम टाकत रस्त्यावर अडथळा निर्माण करुन तहसीलदार यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.

याबाबत रामदास दशरथ कळमकर (वय 54) रा. पिंपळे जगताप (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विजय लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड कंपनीचे मालक विजय ढाका (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.