महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस निरीक्षकावर एट्रॉसीटी दाखल…

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): एका प्रकरणात माघार घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दबाव टाकल्याचं धक्कादायक प्रकरण नुकतच समोर आलं होतं. आरोपी पोलिस निरीक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत फिर्यादीला पोलीस ठाण्यात बोलवून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्या वरपर्यंत ओळखी असून तु माझं काहीच करू शकत नाही, असं धमकावलं होतं. यासंदर्भात फिर्यादीने वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता दाद मिळाली नाही. शेवटी न्यायालयाचं दार ठोठावल्यानंतर याची सत्यता पाहता कोर्टाने एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर पहिल्यांदाच महाराष्ट्रात असा गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

सुशांतकुमार मेश्राम (वय 38, रा. रेशीमबाग, नागपूर) दोन वर्षांपूर्वी 18 ऑक्टोबर 2020 रोजी पुणेहून नागपूरला जात असताना पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यातून फोन आला. त्याप्रमाणे सायंकाळी 6 वाजता सुशांतकुमार त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी उद्या सकाळी या असं त्यांना सांगण्यात आले. मला कोणत्या कारणासाठी बोलवण्यात आलं आहे, असं विचारल्यानंतर तुझ्या विरोधात महिलेची तक्रार असल्याचे सांगितले. यानंतर सुशांतकुमार यांना धक्का बसला. कारण, त्यांनी असं काहीच केलं नव्हतं. ठरल्याप्रमाणे सुशांतकुमार 19 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान पोलीस ठाण्यात हजर झाले.

यावेळी ठाणेदार रवींद्र जाधव यांनी कॅबिनमध्ये बोलावून तुम्ही चिंचवड फ्लायओव्हरवर एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले. मी महिलेला बोलावत असून गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. यानंतर तक्रारदाराला धक्का बसला. यावर सुशांतकुमार म्हणाले, की 18 तारखेला मला पोलीस ठाण्यातून फोन येतो. महिलेची तक्रार आहे. आणि आता सकाळी छेडछाड केली म्हणता हे कसं शक्य आहे? यावर पीआय चिडले. त्यांनी शिवीगाळ करत तक्रारदाराला मारहाण केली. यावेळी माझ्यासोबत असलेल्या सहकारी महिलेसोबत गैरवर्तणूक केली. यांचेवर दोघांवर विविध कलमांखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.

यानंतर एका तासात 2 लाख रुपयांची व्यवस्था करा किंवा सोबत असलेल्या महिलेला शरिरसुखाची मागणी करण्यात आली. ज्यास तिने नकार दिला. यानंतर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. यानंतर तक्रारदार सुशांतकुमार मेश्राम यांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली. यानंतर न्यायालयाने प्रकरणाची सत्यता तपासून संबंधित आरोपी पीआयवर एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सदरच्या प्रकरणी ॲड. स्वप्नील सुनील सातव, ॲड. स्वप्नील किशोर माळवे, ॲड. सुमेध जयंत डोंगरे, ॲड. तुषार तांदळे यांनी काम पाहिले.