crime

कोळगाव डोळसच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): कोळगाव डोळस (ता. शिरुर) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खरेदी करुन घेऊन जाऊन शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोळगाव डोळस (ता. शिरुर) येथील येथील यशवंत कारंडे व बाजीराव सोनवणे या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ऊसाचे पिक घेतलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातील आशिष साठे व नवनाथ झेंडे यांनी त्यांच्या शेतात येऊन पिकाची पाहणी करुन आम्ही सदर ऊस विकत घेत असल्याचे सांगून यशवंत कारंडे यांचा 53 टन 1 लाख 40 हजार रुपयांना तर बाजीराव सोनवणे यांचा 34 टन ऊस 1 लाख 10 हजार रुपयांना विकत घेतला.

मात्र 6 महिने उलटून देखील दोघांना पैसे दिले नाही व पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने याबाबत यशवंत सखाराम कारंडे (वय २५) रा. कोळगाव डोळस (ता. शिरुर) जि. पुणे व बाजीराव सोनवणे (वय ४८) रा. निर्वी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिल्या असल्याने शिरुर पोलिसांनी आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे दोघे रा. चिखली ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव हे करत आहे.