शिरुर तालुक्यातील कंपनीत जाणाऱ्या कामगाराचे हातपाय बांधून लुटणारे जेरबंद

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवर रात्रीच्या सुमारास कंपनीत जाणाऱ्या कामगाराला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून संतोष कोनिराम मोहिते, विकी शिवाजी जाधव व गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे.

वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्रीच्या सुमारास संकल्प फिर्जींग कंपनीचा कामगार हरिष जगताप हा दुचाकीहून येत असताना 3 अज्ञातांनी त्याला अडवून शिवीगाळ, दमदाटी करत त्याचे कपडे काढून कपड्याने त्याचे हातपाय बांधून त्याच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड व दुचाकी घेऊन तिघेजण पळून गेले होते. मात्र जाताना त्यांनी पुन्हा संकेत नामदेव भंडारी या युवकाला देखील मारहाण करत रक्कम व मोबाईल लुटला होता.

याबाबत हरिष पुंडलिक जगताप (वय ३४) रा. राम नगर पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून तीन युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी कोरेगाव भीमा परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, पोलीस शिपाई दगडू वीरकर यांनी कोरेगाव भीमा येथे सापळा लावत संतोष कोनिराम मोहिते (वय २८) व विकी शिवाजी जाधव (वय २४) दोघे रा. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. डोंगरतळ ता. जिंतूर जि. परभणी तसेच गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण (वय २८) रा. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. लोणीकंद ता. हवेली जि. पुणे या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई निरज पिसाळ हे करत आहे.

गणेश उर्फ लहू वर पंधरा हून अधिक गुन्हे...

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कामगाराला लुटणाऱ्या आरोपींपैकी गणेश उर्फ लहू चव्हाण याच्यावर यापूर्वी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 15 हून अधिक गंभीर गुन्हे तर संतोष मोहिते वर पाच गुन्हे दाखल असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.