शिरुर पोलिसांनी बेट भागातील कृषी पंप चोरी करणारी टोळी केली गजाआड

क्राईम

सोळा कृषि विद्युत मोटारींसह चौघे चोर ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील बेट भागात अनेक दिवसांपासून कृषि विद्युत मोटार चोरीचे सत्र सुरू होते. मे महिन्यात आमदाबाद येथुन एकाच वेळी ८ कृषी पंप चोरी गेले होते. तसेच बेट भागामध्ये लागोपाठ कृषी पंप चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी कृषी पंप हे आवश्यक असल्याने त्याच गोष्टीचा फायदा चोर घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. याबाबत समाजमाध्यमातुन पोलीसांच्या कामगीरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. तसेच पोलीसांना कोणताच धागादोरा मिळत नसल्याने शेतकरी वैतागून आंदोलनाच्या पवित्र्यात असताना टाकळी हाजी दूरक्षेत्रच्या पोलिसांनी या चोरांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

बेट भागात चोरांनी मोठया प्रमाणात धुमाकुळ घातल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांना सुचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक राउत यांनी शिरुर पोलीस ठाण्यातील पोलीसांची वेगवेगळी पथके तयार करुन सतत त्या गुन्हयाच्या तपासामध्ये सातत्य ठेवुन होते. टाकळी हाजी येथील पोलिस अंमलदार सुरेश नागलोत यांना या प्रकरणी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळताच त्यांनी संशयित व्यक्तींची खात्री करून घेतली.

unique international school
unique international school

त्यामध्ये १) पांडुरग शिवाजी बोडरे (वय २०) २) कुलदिप उर्फ मोन्या बबन बोडरे (वय २०) रा. रावडेवाडी ता. शिरूर जि. पुणे ३) अजर हुसेन खान (वय २२) रा. सिन्नर नाशिक ४) अख्तर उर्फ कुलु हुसेन खान (वय २७) रा. अहमदाबाद फाटा,शिरूर ( भंगार व्यवसायीक ) यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचे कडुन १७ कृषी पंप, गुन्हा करण्यासाठी वापरत असलेली एक मोटार सायकल आणि एक छोटा हत्ती असा माल हस्तगत करण्यात आलेला असुन एकुण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. इतर ही अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्याप्रमाणे अधिक तपास शिरुर पोलीस करत आहेत.

अनेक दिवसांपासून मोटार चोरी,केबल चोरी , घरफोडी, दुकान फुटणे असे अनेक प्रकार या भागात सातत्याने घडू लागल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते .शेतकरी संघटना आवाज उठविण्याच्या पवित्र्यात होती.एवढ्या मोठ्या प्रमाणात कृषि मोटारी मुद्देमालासह पकडल्याने शेतकरी वर्गातून पोलिसांच्या या कामगिरीवर समाधान व्यक्त होत आहे. सदरचे गुन्हे उघडकीस आल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचे शेतीसाठी उपयुक्त असलेले चोरीला गेलेले कृषी पंप त्यांना परत मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहे त्यामुळे बेट भागातील शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस मितेश गटटे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलीस नाईक धनजंय थेऊरकर, सहायक फौजदार नजिम पठाण, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश नागलोत, विशाल पालवे, दिपक पवार, राजेंद्र गोपाळे, विनोद काळे होमगार्ड आकाश येवले व बिपीन खामकर यांच्या पथकाने केलेली आहे.