Shirur Robbery

शिरूर तालुक्यात घरफोडी; बेट भागातील चोऱ्यांचे सत्र सुरूच….

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शिंदेवस्ती येथे मंगळवारी (ता. ५) मध्यरात्री सखाराम मारुती मेचे यांचे घर फोडून त्यांच्या कपाटातील अंदाजे १५ तोळे सोन्याचे अलंकार, नवीन साड्या, कपडे घेवून चोर पसार झाले आहेत.

चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडली तेव्हा दरवाजा शेजारी भिंतीचा काही भाग खाली पडला. शिवाय, हे दोघे जिथे झोपले होते त्यांच्या शेजारीच कपाट होते. त्याचे पण लॉक तोडले तरीही यांना जाग आली नाही. चोरट्यांनी घराची खिडकी उघडून सखाराम व त्यांच्या पत्नी शर्मिला यांना गुंगीचा फवारा मारला असावा, अशी शंका प्रत्यक्ष दर्शी यांनी व्यक्त केली आहे. यामुळे चोरटे वेगवेगळ्या शक्कल लढवून चोऱ्या करत असल्याची शक्यता आहे.

पहाटे चारच्या सुमारास मेचे यांना जाग आली तेव्हा त्यांना अचानक दरवाजा आणि कपाट उघडे दिसल्याने त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला व त्यानंतर पोलिसांना फोन केला. गस्तीवर असलेले पोलिस नाईक अनिल आगलावे आणि येवले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

शिरूर तालुक्यात आतापर्यंत विद्युत मोटारी, केबल, दुकानांची चोरी असे प्रकार घडत असताना घरफोडी झाल्याने शेतकरी वर्गात प्रंचड घबराट निर्माण झाली आहे. शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिरूर पोलिस यांना याबाबत विचारले असता मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत आहेत. एकंदरीतच पोलिस चोऱ्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या चोऱ्यांचा सत्राबाबत व दीड महीना उलटूनही मोटार चोरीतील आरोपी न मिळाल्याने आमदाबाद गाव बंद ठेवण्याबाबत ग्रामीण पोलिस अधिक्षक यांना याबाबत लेखी निवेदन देणार असल्याचे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे व आमदाबाद ग्रामस्थांनी सांगितले आहे.

unique international school
unique international school