dummy mla car

शिक्रापूर पोलिसांनी पकडला डमी आमदार…

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी काळ्या काचांची गाडी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अशाच डमी आमदाराच्या गाड्यांना ज्या भाजपच्या आमदाराने स्टिकर पुरविले होते त्यानेच सदर गाडीलाही स्टिकर दिल्याची माहिती पुढे आली आहे.

शिक्रापूर येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर लावलेल्या चारचाकी गाड्या नेहमी गिरक्या घालत असतात. शिक्रापूर पोलिस स्टेशन परिसरात पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी संशयास्पद गाड्यांची चौकशी आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर असलेली एक गडद काळ्या काचांची तसेच नंबर नसलेली स्विफ्ट गाडी फिरत असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना समजले. त्यांनतर पोलिस हवालदार अमोल दांडगे यांनी सदर कार ताब्यात घेतली. सदर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांची चांगलीच धावपळ झाली.

पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले की, ‘असला गंभीर प्रकार सहन केला जाणार नसून, संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. ज्या आमदाराने या गाडीसाठी स्टिकर पुरविले त्याची देखील चौकशी केली आहे.’ तर पोलिस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गाडीवर चक्क सतरा पावत्या व दंड…
शिक्रापूर पोलिसांनी जप्त केलेल्या डमी आमदाराच्या कारला फक्त पाठीमागील बाजूने नंबर असून तो देखील खूप पातळ अक्षरात आहे. मात्र, सदर कार वर तब्बल सतरा पावत्यांचा दंड असून दंडाची रक्कम देखील पस्तीस हजार असल्याने हि कार खरेच आमदाराची आहे का? आमदार काळ्या काचा का करतील ? तसेच आमदार नंबर पुसटसा का टाकतील असा देखील प्रश्न सर्वांना पडला आहे.