शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील करडे MIDC परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांना शिरूर पोलिसांनी अखेर आळा घातला आहे. GPLD इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या स्टोन क्रशर प्लांटमधून चोरी गेलेल्या १५० एम.एम क्षमतेच्या १८ मीटर लांबीच्या केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळत तब्बल ३६,००० रुपयांचा केबल वायर आणि चोरीसाठी वापरलेली एमएच १४ ईपी ३३०८ क्रमांकाची एर्टिगा गाडी जप्त केली आहे. चौकशीत आरोपींनी आणखी एका गुन्ह्याची कबुली देत १,२५,६२० रुपयांचे कॉपर ट्यूब बंडल हेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
२३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ७ ते २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० या वेळेत न्हावरे, गट नं. ८५०/३ येथील GPLD इंफ्रा कंपनीच्या स्टोन क्रशर प्लांटमधील मोटारीला जोडलेली १८ मीटर लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी कापून पळवली होती. या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. ७६५/२०२५, कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
करडे MIDC परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अशाच प्रकारचे तांब्याच्या तारा चोरीचे अनेक गुन्हे घडत होते. या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने पाहत पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथक गठित केले. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील CCTV फूटेजच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवले. पुरावे जमा होताच तपास पथकाने संशयितांना ताब्यात घेतले असता आरोपी 1 विशाल मारूती सुर्यतळ (२४ वर्षे), 2. प्रशांत ध्रुपद सुर्यतळ (२७ वर्षे, दोघेही रा. गोळेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनमधील गु.र.नं. ६८३/२०२५, कलम ३०५ मधील कॉपर ट्यूब चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने १,२५,६२० रुपये किंमतीचे कॉपर ट्यूब बंडल आरोपींकडून जप्त केले.
संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सागर शेळके, राजेंद्र बनकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भोते, पोलिस अमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, अजय पाटील
या पथकाने कौशल्यपूर्ण तपास, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे केवळ मोठा मुद्देमालच जप्त केला नाही तर MIDC परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांचे जाळे उध्वस्त केले आहे.
दरम्यान, या मोठ्या कारवाईमुळे करडे MIDC परिसरातील वारंवार होणाऱ्या तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलिसांच्या या तडाखेबाज कारवाईचे स्थानिक उद्योग क्षेत्राकडून कौतुक होत आहे.
शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अश्लील चाळे; कारवाईची मागणी…
शिरूर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणाचा केला उलगडा, आरोपी गजाआड, सोनेही जप्त…
शिरूर तालुक्यात शेताच्या वादातून दोघांवर हल्ला; लोखंडी गज व विटेचा वापर…
शिरूर तालुक्यात महिलेस शिवीगाळ करून मारहाण; गुन्हा दाखल…
शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…