शिरुर एस टी आगारात बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला एस टी कर्मचाऱ्याची शिवीगाळ 

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथील दारुच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कर्मचाऱ्याला पत्रकाराला शिवीगाळ करणे चांगलेच महागात पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. शांताराम दौंडकर असे गुन्हा दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

शिरुर तालुक्यातील एक पत्रकार शिरुर एस टी आगारातील बातमी करण्यासाठी गेला असता शांताराम दौंडकर यांनी त्या पत्रकाराला तू पत्रकार आहेस मला माहित आहे वारंवार तू काड्या करतोस बातम्या देतोस. तू आता बातमी घेण्यासाठीच आला आहे. तू इथून निघून जा नाहीतर मार खाशील अशा पद्धतीची भाषा वापरून पूर्ण पणे दारूच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर याने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शिरूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ शिरूर तालुका यांच्या वतीने शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी पत्रकार नितीन बारवकर, प्रविण गायकवाड, सतिश धुमाळ, अरुणकुमार मोटे, तेजस फडके, प्रमोल कुसेकर, धनंजय साळवे,शकिल मणियार, सागर रोकडे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते. या निवेदनाची दखल घेऊन शिरुर पोलीस स्टेशन या ठिकाणी शांताराम दौंडकर या एसटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य” असणाऱ्या एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनाच्या दिवशी पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिरुर एसटी आगारातील तक्रार दाखल केलेल्या कर्मचाऱ्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.तसेच या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात रिपोर्ट पाठवणार आहे..

सुरेशकुमार राऊत

(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिरुर)

शिरुर आगारातील शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने पत्रकाराला अरेरावी केल्याने त्या संबंधित पत्रकाराने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असुन दौंडकर यांचा अहवाल मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणार आहे.

भैरवनाथ दळवी

(प्रभारी आगारप्रमुख)