सणसवाडीतील कंपनीतून हजारोंचे साहित्य चोरी

क्राईम शिरूर तालुका

सणसवाडी (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीतून हजारो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीत वाहनांच्या पार्टला पेंटिंग करण्याचे काम केले जात असल्याने कंपनीत पेंटिंग करण्यासाठी वेगवेगळे कलर तसेच त्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणून ठेवलेले असते.

सदर कंपनीत असलेले सर्व साहित्य एका गोडवून ठेवून एच आर मॅनेजर घरी गेले होते. त्या दिवशी सकाळच्या सुमारास काही कामगार कंपनीत आले असताना त्यांना गोडाऊनचे कुलूप तुटलेले दिसून आल्याने त्यांनी एच आर मॅनेजर दिपक शिरसठ यांना माहिती दिली असता त्यांनी कामगारांच्या मदतीने गोडाऊन मध्ये पाहणी केली असता कंपनीतील तब्बल सत्तर हजार रुपयांचे कलर व आदी साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत अंकिता ॲटो कोटर्स कंपनीचे एच आर मॅनेजर दिपक अशोक शिरसठ (वय ३३) रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल दांडगे हे करत आहे.