शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने ATM फोडणारा जेरबंद

क्राईम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौकातील ATM मशीनचे CCTV तसेच सायरनच्या वायर कापून ATM फोडण्याचा प्रयत्न करुन पळून जाणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी सतर्कतेने जेरबंद केले असून मयूर उर्फ लहू आदिनाथ फसले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे आयसिआयसिआय बँकेचे ATM मशीन असून १६ ऑगस्ट रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एका युवकाने ATM सेंटर मधील सायरन तसेच CCTV च्या वायर कापून ATM मशीन दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती ATM कंट्रोल मुंबई येथे मिळताच त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला फोन करत ठाणे अंमलदार गणेश करपे व कृष्णा व्यवहारे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस हवालदार शंकर साळुंके, पोलीस नाईक अंबादास थोरे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली असता पोलीस येताच एक संशयित युवक दुचाकीहून चाकण बाजूकडे जात असल्याचे दिसले याचवेळी ATM कंट्रोल मुंबई येथून CCTV फुटेल पोलिसांना प्राप्त झाले.

दरम्यान पोलीस हवालदार शंकर साळुंके व पोलीस नाईक अंबादास थोरे यांनी चाकण बाजूकडे आपला मोर्चा वळवत तीन किलोमीटर पाठलाग करत पळून जाणाऱ्या आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी ATM ची पाहणी केली असता सीसीटीव्ही सह सायरनचे तसेच मशीनचे नुकसान झाले असल्याचे दिसून आले. याबाबत ATM एजन्सीचे विकास जालिंदर भगत (वय ३४) रा. कवडे रोड घोरपडी पुणे मूळ रा. राजुरी रा. पुरंदर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मयूर उर्फ लहू आदिनाथ फसले (वय २४) रा. स्वप्ननगरी सोसायटी विठ्ठलनगर पिंपरी पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.