शिरूरमध्ये मध्यरात्री बिबट्याचा थरार! नागरिक सतर्क, वन विभाग अलर्ट मोडवर

मुख्य बातम्या शिरूर तालुका

सकाळी सहा वाजता बिबट्याला नदीच्या दिशेने हुसकावण्यात यश; पिंजरे, ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्यांची तैनाती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील जोशीवाडी परिसरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळताच वन विभागाची यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. मानवी वस्ती, अरुंद बोळ्या आणि दाट लोकवस्तीमुळे बिबट्याचा ठावठिकाणा शोधणे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, वन विभागाच्या रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेमुळे अखेर सकाळी सहा वाजता बिबट्याला सुरक्षितपणे नदीच्या दिशेने हुसकावण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

जोशीवाडी परिसरात बिबट्याच्या हालचालीची बातमी पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य धोका लक्षात घेऊन वन विभागाने संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन राबविले. वाहनांद्वारे गस्त, सर्चलाईट आणि टॉर्चच्या सहाय्याने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. रात्रीचा अंधार आणि अरुंद गल्ल्यांमुळे मोहिमेत अडथळे येत असतानाही वन कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने काम केले.

दरम्यान, बिबट पुन्हा मानवी वस्तीत येऊ नये यासाठी पांजरपोळ परिसरात एक पिंजरा आधीच बसविण्यात आला आहे. आज आणखी दोन पिंजरे तसेच ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येणार असून, परिसराच्या सखोल पाहणीसाठी ड्रोनद्वारे निरीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

या मोहिमेत निळकंठ गव्हाणे (वनपरीक्षेत्र अधिकारी, शिरूर) यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक गणेश झिरपे, जालिंदर सानप, वन विभागाचे इतर कर्मचारी, बेस कॅम्पचे सदस्य तसेच माणिकडोह येथील डॉ. विसळकर व त्यांची टीम सहभागी झाली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली.

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बिबट दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. संध्याकाळी व विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, लहान मुलांना रात्री एकटे बाहेर सोडू नये, घरासमोर व परिसरात पुरेसा उजेड ठेवावा तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.

वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून, पुढील काही दिवस शिरूर शहर परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.