शिंदोडीत ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात; ३.९३ कोटींच्या नळपाणी योजनेचे लोकार्पण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरे (तेजस फडके): शिरुर पंचायत समिती अंतर्गत शिंदोडी ग्रामपंचायतीत जल जीवन मिशन अंतर्गत पुर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल ३ कोटी ९३ लाख रुपये अंदाजपत्रकीय खर्चाच्या या योजनेमुळे शिंदोडी गावाला शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातून सर्वप्रथम ‘जल अर्पण दिवस’ साजरा करणारी ही नळ योजना ठरली आहे.

प्रभातफेरी आणि लेझिममधून पाण्याचे महत्त्व

या कार्यक्रमाची सुरुवात शिंदोडी जिल्हा परिषद शाळा तसेच हरुबाई शितोळे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने झाली. गावातील प्रमुख मार्गांवरुन विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाच्या फलकाद्वारे पाण्याच्या बचतीबाबत संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझिम सादर करत ‘पाणी हेच जीवन’ हा संदेश प्रभावीपणे मांडला. या उपक्रमामुळे कार्यक्रमातुन पाण्याच्या बचतीबाबत सामाजिक संदेश देण्यात आला.

यावेळी गावात बांधण्यात आलेल्या नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ मान्यवरांच्या हस्ते जलबंधन करुन ‘जल अर्पण’ विधी साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी जलस्रोतांचे जतन करण्याची व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची शपथ घेतली. ३.९३ कोटींच्या या महत्वकांक्षी योजनेमुळे शिंदोडी गावातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीद्वारे स्वच्छ पाणी पोहोचणार आहे. यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबणार असून याचा मोठा फायदा होणार आहे.

‘जल अर्पण दिवस’ निमित्ताने शिंदोडीने विकासाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले असून, हा आदर्श इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या योजनांचा योग्य वापर करून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र साळुंखे, प्रास्ताविक इंद्रभान ओव्हाळ तर आभार बबनराव खेडकर यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या वृषाली वाळके, पंचायत समिती सदस्य दिपक पवार, सरपंच अरुण खेडकर तसेच पुणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, सहाय्यक अभियंता प्रतीक देवर्डे, शिरुर ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे अभियंता पवन कोरे, उपअभियंता सतीश पवार, सहाय्यक अभियंता रमेश व्हनमाने, शाखा अभियंता वैभव कोकरे, कनिष्ठ सहायक मछिंद्र नेहरकर, इन्फ्रा तज्ञ उत्कर्ष वासणीक (राज्य पाणी व स्वच्छता मिशन), नॅबकॉन टीम प्रमुख आकाश अर्जुने, ठेकेदार विठ्ठल खोडदे, रामदास ठुबे, किरण ओव्हाळ, तालुका स्वच्छता विभागाच्या कोऑर्डिनेटर शबाना शेख, यांच्यासह करडे गावचे उद्योजक आर बी जगदाळे पाटील, दत्तात्रय वाळके, शेखलाल तांबोळी तसेच अनेक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.