लेक चेअरमन झाला पण खुर्चीत बसायचा मान मात्र आईला दिला….

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोणतंही मुलं जन्माला येण्याआधी नऊ महिने आधीच त्याची आई त्याला ओळखत असते. अपत्य जन्माला आल्यानंतर जगाला त्याची ओळख होते. परंतु आईला मात्र त्याच्या अस्तित्वाची आधीच चाहूल लागते. त्यामुळे मुलं आणि आईच नात हे जगावेगळच असत. या कलियुगात आईला वृद्धाश्रमात पाठवणारी मुलं आहेत. तशीच आईला सांभाळणारी आणि आईचा शब्द पाळणारीही मुलं आहेत. स्वतःला पद मिळाल्यावर स्वतः खुर्चीत बसण्याआधी स्वतःच्या आईला त्या खुर्चीत बसवून मान देत एक नवीन पायंडा पाडला आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी येथील बापुसाहेब कांतीलाल शिंदे यांची आज (दि 1) ऑगस्ट रोजी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गावात त्यांच्या सत्कार करण्यासाठी मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. परंतु बापुसाहेब शिंदे यांनी स्वतः सत्कार न स्वीकारता आईला फेटा बांधायला लावला तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात आल्यानंतर शिंदे यांनी स्वतः अध्यक्ष पदाच्या खुर्चीत न बसता स्वतःची आई कौशल्या कांतीलाल शिंदे यांना तो मान दिला. त्यामुळे त्यांच्या आईंचा ऊर अभिमानाने भरुन आला. तसेच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

यावेळी बोलताना रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बापुसाहेब शिंदे म्हणाले, आम्ही तिन्ही भावंड लहान असताना आमचे वडील वारले. आमच्या आईने आम्हा तिन्ही भावंडांना अतिशय हालाखीच्या परिस्थितीत कष्टाने मोठे केले. आज आम्ही तिघेही बहीण भाऊ जे काही आहोत ते फक्त आईमुळेच आहोत. त्यामुळे आईपेक्षा मला कोणतच पद मोठं वाटतं नाही. त्यामुळे मी स्वतः अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना आईलाच तो मान दिला. बापुसाहेब शिंदे यांनी यापूर्वीही नवीन हॉटेलचे उदघाटन आईच्या हस्ते करुन समाजात एक वेगळा संदेश दिला होता.