महाराष्ट्र बँकेची ९ महीन्यातच शेतकऱ्यांकडून नियमबाहय पिककर्ज वसुली…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेकडून ग्राहकांची गैरसोय होत असून ग्राहकांबरोबर उद्धटपणे वागत असल्याचा आरोप होत असतानाच येथील नियमित कर्जदार खातेदारांना चक्क 9 महिन्यातच नुतनीकरण करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने सदर शेतकरी खातेदारांना धक्का बसला आहे.

एका नियमित पीककर्ज खातेदाराची मुदत जुलै महिन्यात संपत असूनही त्यास नोटीस आल्याने त्यांनी बँकेत जावून चौकशी केली असता बँकेतील शाखा अधिकाऱ्यांनी तुम्हाला जर अनुदान मिळवायचे असेल तर आताच नुतनीकरण करून घ्या, असा सल्ला देत त्यांना किती रकमेचा भरणा करावा लागेल हेही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले. त्यामुळे अचानक आलेल्या नोटीस ने काहीही मनी ध्यानी नसताना ऐन मार्च अखेरीस मार्च एंड साठी केवळ दोनच दिवस शिल्लक असताना भरणा करण्यास सांगितल्याने ही रक्कम अचानक कशी उभी करायची या विचाराने त्या ग्राहकास प्रचंड मानसिक ताण वाढल्याने त्याचा बी पी वाढला गेला असून त्याला दवाखान्यात अडमिट होण्याची वेळ आली आहे.

बँकेतील शाखाधिकारी ग्राहकांशी संवाद साधताना कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. माझी या ठिकाणी फक्त वसुलीसाठी नियुक्ती झाली आहे, असे बोलत नवीन कर्ज घेणाऱ्यांना अधिकारी सहकार्य करण्यास टाळाटाळ करत असल्याने नवीन कर्ज प्रकरणाबाबत अनेक हेलपाटे मारूनही अनेकांना दुसऱ्या बँकेचा दरवाजा ठोठावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थ बँकेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करणार असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले.

पीककर्ज घेणारा शेतकरी नियमित असतानाही आणि त्याच्या कर्जाची मुदत संपण्याच्या आधीच 3 महिने वसुलीसाठी नोटीस पाठवून शेतकऱ्यांना जो त्रास दिला जात आहे. याचा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत. याचा जाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला जाईल, असे शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे यांनी सांगितले.