लोकप्रतिनिधींनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्याचा घातलाय घाट, त्यामुळे विकास कामांची लागतीये वाट

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात काही दिवसांपासुन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनीच्या फंडातुन विकासकामे चालु असुन ती कामे आर्थिक फायद्यासाठी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत यासाठी राजकीय पुढारी कर्मचाऱ्यांपासुन ते अधिकाऱ्यांपर्यंत सेटिंग लावत आहेत. तसेच स्थानिक गावातील सरपंच ते तालुक्यातील सगळ्यांच लोकप्रतिनिधींनीचे या विकासकामात आर्थिक हितसंबंध असल्याने कामाचा दर्जा मात्र घसरत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.

शिरुर तालुक्यात सध्या अनेक गावात अंतर्गत रस्ते, गटार लाईन, ग्रामपंचायत कार्यालय, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशी विविध विकासकामे सुरु असुन हि कामे मिळवणारे ठेकेदार हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पुढाऱ्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला काम कसे मिळवून देता येईल यासाठी हे राजकीय पुढारी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. संबंधित ठेकेदाराला काम मिळाल्यानंतर त्याच्याकडुन आर्थिक लाभ मिळवत विकासकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र सध्या संपूर्ण तालुक्यात दिसत आहे.

ऑनलाईन टेंडर पद्धत फक्त नावापुरतीच…

सध्या जवळपास सगळ्याच विकास कामांसाठी ऑनलाईन टेंडर पद्धतीचा वापर केला जातो. इथं सुद्धा हे राजकीय पुढारी लोक आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना टेंडर मिळावे यासाठी एकाच ठेकेदाराला वेगवेगळ्या नावाने कमी जास्त रेट करुन टेंडर भरायला लावतात. त्यामुळे ते टेंडर कोणाला जरी मिळालं तरी त्यांच्या मर्जीतीलच लोकांना मिळत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या आर्थिक हव्यासापोटी ठेकेदारही दर्जाहीन काम करत असल्याने त्यामुळे विकास कामांचा दर्जा ढासळत आहे.