Mahaganpati

महागणपती मंदिरात मुक्तद्वार यात्रेचे आयोजन…

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती मंदिरामध्ये रविवारपासून (ता. २८) साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाद्रपद गणेशोत्सवाची तयारी चालू आहे. महागणपती मंदिरात रविवार (ता. २८) ते बुधवार (ता. ३१) मुक्तद्वार यात्रेचे आयोजन केले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती देवस्थानने दिली.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत उत्सवातील धार्मिक सोहळे, विविध उपक्रम व उत्सवकाळातील कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. शेखर देव, डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर व अॅड. विजयराज दरेकर या विश्वस्तांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत उत्सवातील तयारीचा आढावा घेतला. यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱहे, हिशेबनीस संतोष रणविसे, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

भाद्रपद गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवशी (रविवार, सोमवार व मंगळवार) पहाटे तीन वाजता; तर बुधवारी (ता. ३१) मध्यरात्री एक वाजता महागणपती मंदिर उघडणार आहे. रांजणगावच्या चार दिशेला असलेल्या गावांतून गणपतीच्या बहिणींना भाद्रपद उत्सवासाठी पालखीतून आणण्याची प्रथा असल्याने रविवारी पूर्वद्वार म्हणून करडे येथील मांजराई देवीला ( दोंदलाई) आणण्यासाठी पालखी जाणार असून, पाचुंदकर आळीला या पालखीचा मान आहे. सोमवारी (ता. २९) दक्षिणद्वार निमित्त निमगाव म्हाळुंगी येथून आसराई देवीला ( शिरसाई ) आणण्यासाठी पालखी जाणार असून, त्या पालखीचा मान माळी आळीला आहे. पश्चिमद्वार निमित्त मंगळवारी (ता. ३०) गणेगावातून ओझराई देवीला आणण्यासाठी जाणाऱ्या पालखीचा मान लांडे आळीकडे असून, शेळके आळीतील मानकरी उत्तरद्वारनिमित्त बुधवारी (ता. ३१ ) ढोकसांगवीतून मुक्ताई देवीला पालखीतून आणण्यासाठी जाणार आहे. करडे, निमगाव व गणेगाव येथे जाणाऱ्या पालख्या सकाळी दहा वाजता तर ढोकसांगवीला जाणाऱ्या पालखीचे प्रस्थान दुपारी सव्वाबाराच्या सुमारास होणार आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता देऊळवाड्यातून महागणपतीच्या पालखी मिरवणुकीची ग्रामप्रदक्षिणा होणार असून, दुपारी महाप्रसादानंतर मिरवणुकीची सांगता होईल. शुक्रवारी (ता. २) सकाळी ९ ते दुपारी एक वाजेपर्यंत श्रींच्या पुढे भाविकांची दंडवते होतील, दुपारी चार ते सहा काल्याचे कीर्तन आणि सायंकाळी पाऊल घडीचे कीर्तन होणार आहे. शनिवारी (ता. ३) मानकऱ्यांच्या बिदागी वाटपाने भाद्रपद गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. उत्सव कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

मंदिर परिसरासह कळस व महाद्वार आकर्षक विद्युत रोषणाईने उजळले असून, गणेशोत्सवकाळात रांजणगावसह करडे, निमगाव, गणेगाव व ढोकसांगवीत इतरत्र कुठेही गणेशाची प्रतिष्ठापणा केली जात नाही. महागणपतीचीच पूजाअर्चा या गावांतून केली जाते. चार दिशांच्या द्वारयात्रेतील सहभागी द्वारकरी, स्थानिक गावकरी व भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा तयार केल्या आहेत.

मुक्तद्वार दर्शन…
महागणपती मंदिरात रविवार (ता. २८) ते बुधवार (ता. ३१) मुक्तद्वार यात्रेचे आयोजन केले आहे. या कालावधीत थेट गाभान्यात जाऊन महागणपतीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. ‘श्रीं’च्या मूर्तीवर जलाभिषेक घालता येणार आहे. मुक्तद्वार दर्शनासाठी रविवार, सोमवार व मंगळवारी पहाटे तीन ते सायंकाळी पाच; तर बुधवारी मध्यरात्री एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गाभारा उघडा असेल. गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) सकाळी सहाला सुरू होणारे मुक्तद्वार दर्शन दहा वाजता बंद होईल, अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan