अभ्यासिकेमुळे शिक्रापुरातून अनेक अधिकारी घडतील: अशोक पवार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर ग्रामपंचायतने उभारलेल्या अभ्यासिकेचे मोठ्या थाटात उद्घाटन

शिक्रापूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगासह अन्य परीक्षा देण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध नसल्याने अडचणी येत असतात, मात्र सध्या विद्यार्थी अशा परीक्षांकडे जास्त कल देत असून शिक्रापूर सारख्या गावातून भविष्यात अनेक अधिकारी घडतील, असे प्रतिपादन आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी बनविलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे आमदार ॲड. अशोक बापू पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उपसरपंच मयूर करंजे यांनी वडील स्व. खंडेराव करंजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० हजार रुपयांची पुस्तके अभ्यासिकेस देण्याची घोषणा केली. तसेच छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे, तसेच राजर्षी शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे देखिल अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयुर करंजे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी सरपंच आबासाहेब करंजे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, विशाल खरपुडे, कृष्णा सासवडे, पूजा भुजबळ, मोहिनी युवराज मांढरे, शालन राऊत, उषा राऊत, बाबासाहेब सासवडे, सोसायटीचे चेअरमन दत्ता मांढरे, मोहनशेठ विरोळे, सोमनाथ भुजबळ, काकासाहेब चव्हाण, रवींद्र पाटील, बाबा चव्हाण, राजेंद्र मांढरे, गणेश चव्हाण, विजय काळे, अमर करंजे यांसह आदी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहिणी विरोळे, निवृत्त पोलिस अधिकारी अरुण सोंडे, अरुण जगताप, नव्याने पोलीस उपनिरीक्षक झालेले विनायक भोसले, ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक महेश शिंदे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दरम्यान यावेळी अधिक बोलताना शाळेच्या इमारती बांधताना एक परिपूर्ण आराखडा राज्य शासनाने बनविण्याची गरज असून शिक्रापूरची वाढती गरज पाहता शाळांमधील नवीन वर्गखोल्या तयार करण्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन यावेळी आमदार अशोक पवार यांनी दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच सुभाष खैरे यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर यांनी आभार मानले.

2 thoughts on “अभ्यासिकेमुळे शिक्रापुरातून अनेक अधिकारी घडतील: अशोक पवार

Comments are closed.