RANJANGAON

रांजणगाव पोलिसांनी त्या “पाच” जणांचा बळी घेणाऱ्या कंटेनर चालकास ठोकल्या बेड्या

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर एल जी कंपनीसमोर असणाऱ्या हॉटेल एस नाईन हॉटेल जवळ बुधवार (दि १७) रोजी मध्यरात्री १:३० च्या सुमारास अहमदनगरकडुन-पुण्याकडे चारचाकी इको गाडीला रांजणगावकडुन कारेगावकडे विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेंनरची धडक बसुन झालेल्या गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर कंटेंनर चालक पळुन गेला होता. परंतु रांजणगाव MIDC पोलिसांनी त्याला हरियाणा राज्यात जाऊन अटक केली आहे.

दि १७ ऑगस्ट रोजी रात्री १:३० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर रांजणगावच्या बाजूने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेंनरने पुण्याकडे जाणाऱ्या इको गाडीला धडक दिली. त्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कंटेंनर चालक पळून गेला होता. तसेच त्याचा मोबाइल गाडीतच राहिल्याने रांजणगाव MIDC पोलिसांना आरोपी शोधण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मदतीने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत कंटेंनर चालक उमर सुवेदिन मोहमद (वय 34) रा. खलनाका, ता. हथिन, जि. पळवल राज्य हरियाणा याला ताब्यात घेऊन आज (दि २२) रोजी शिरुर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे करत आहेत.