wabalewadi-school

वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरण अन् बरच काही…

मुख्य बातम्या

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यावरून काही ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्यावर अर्वाच्य भाषेत केलेली टीका निषेधार्थ असून, या टीकाकारांना यापुढे त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा शिक्रापूरच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे. आमदारांना घेऊन आम्ही वाबळेवाडीत येतो हिम्मत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हानही या नेत्यांनी यावेळी दिले.

वाबळेवाडीच्या काही ग्रामस्थांनी महिलांना पुढे करून आमदार अशोक पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आणि वाडीत येण्यास बंदी घालण्याचा इशारा दिला. यावरून शिक्रापूरचे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन सदर प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या बैठकीला शिक्रापूर मधील प्रमुख नेते, ग्रामपंचायत सदस्य तसेच वाबळेवाडीतील काही प्रमुख युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

वाबळेवाडी हे स्वतंत्र गाव नसून ती वाडी शिक्रापूर गावचा एक भाग आहे, असे स्पष्ट करून आमदार अशोक पवार यांना गावबंदी करण्याचा ठराव शिक्रापूर ग्रामपंचायत यांनी केलेला नाही. त्याचबरोबर वाबळेवाडीतील मूठभर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतल्याचा दावा जो केला आहे तो खोटा आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. वाबळेवाडी शाळेशी निगडित असलेले आणि त्यांचे हितसंबंध असलेल्या ठराविक ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांना हाताशी धरून चुकीची माहिती देत विनाकारण गैरसमज पसरू नयेत.

वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेताना पालकांकडून 25 ते 35 हजार रुपयांच्या पावत्यांची खात्री आम्ही स्वतः करून घेतली आहे तसेच प्रवेशाबाबत तेथील तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे काही सदस्य आणि काही ग्रामस्थांनी आपल्या मर्जीतील लोकांच्या पाल्यांना प्रवेश दिले तर काहींना प्रवेश नाकारले याच्या तक्रारीही आमच्याकडे यापूर्वी आल्या होत्या. परंतु, शाळेत चुकीचे वातावरण निर्माण होऊ नये त्याचबरोबर शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी आम्ही आजवर दुर्लक्ष केले. मात्र, शाळेच्या आडून मनमानी कारभार आणि गैरव्यवहार होत असल्याचे पुढे आल्यावर आम्ही विद्यार्थीहितासाठी स्वस्थ बसणार नाही.

या शाळेच्या गैरव्यवहाराबाबत जिल्हा परिषदेने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्ताना सादर केलेल्या दोषारोपाच्या अहवालाच्या प्रती आम्ही पाहिल्या आहेत. यामध्ये या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर काही आरोप निश्चित केले आहेत. विभागीय आयुक्तांसमोर याबाबत सुनावणी पूर्ण होऊन नऊ महिने उलटून गेले तरी त्यावर निकाल दिला गेला नाही. या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल काहींनी विनाकारण आकांड तांडव करण्याचे काहीच कारण नाही.

चौकशी समिती आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारीअधिकारी यांच्यावर सरकारमधील वरिष्ठ नेत्यांकडे जावून दबाव आणण्याचा प्रयत्न या हितसंबंधीय ग्रामस्थांनी केला आहे, अशी आमची माहिती आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण गाजत असताना त्यावर तातडीने निर्णय दिला जात नाही यावरून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे. क्लीन चिट देण्यात माहीर असणाऱ्या या सरकारकडून वेगळी अपेक्षा ठेवणे हे सुद्धा चुकीचे होईल.

या शाळेच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाल्यावर पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांना आंदोलन करण्यासाठी चिथावणी देण्याचा प्रकार या शाळेतील एक दोन शिक्षकांनी केला, त्यांची ही कृती शिस्तभंग प्रकाराची आहे. या गैरप्रकाराची चौकशी सुरू झाल्यावर तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे, उपशिक्षक एकनाथ खैरे यांनी आपले स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज पंचायत समितीला दिले होते. मात्र, प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती देताना त्यांनी आपण राजीनामा दिला असल्याचे सांगितले. या शिक्षकांनी व काही ठराविक ग्रामस्थांनी सातत्याने एकांगी आणि चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना देताना आपल्यावर आणि शाळेवर अन्याय होत असल्याचा डांगोरा पिटला.

वाबळेवाडी ही शिक्रापूर गावचा एक भाग असतानाही ती वाडी स्वतंत्र गाव असल्याचे चित्र दत्तात्रय वारे आणि काही ग्रामस्थांनी तयार करताना शिक्रापूर ग्रामस्थांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या नावाखाली अशा ग्रामस्थांनी आणि या शिक्षकांनी आमच्या गावात वेगळे राजकारण खेळू नये, असा इशारा यावेळी दिला. या शाळेच्या भौतिक विकासासाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीने वेळोवेळी सहकार्य केले, तसेच आमदार अशोक पवार यांनी वाबळेवाडीत विविध विकासकामे केली. प्रसंगी त्यांनी वाडीतील ग्रामस्थांच्या वैयक्तिक अडचणीच्या प्रसंगी मदत देखील केली आहे. असे असतानाही काही ठराविक ग्रामस्थ आमदारांच्या वैयक्तिक आकसापोटी कोणाकडून लिहून आणलेली स्क्रिप्ट निरागस महिलांच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रकार करीत आहेत. या ग्रामस्थांनी असे प्रकार ताबडतोब थांबवावे अन्यथा त्यांना देखील जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा या निमित्ताने आम्ही देत आहोत.

या बैठकीला माजी सरपंच बापूसाहेब जकाते माजी सरपंच आबासाहेब करंजे, रावसाहेबदादा पवार, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक अरुणदादा करंजे, समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक सोमनाथ भुजबळ, शिरूर बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब सासवडे, शिक्रापूरच्या उपसरपंच मोहिनी मांढरे, मयूर करंजे, सुभाष खैरे, रमेश थोरात, विशाल खरपुडे, पूजा भुजबळ, सारिका सासवडे, वंदना भुजबळ, सीमा लांडे, कविता टेमगिरे हे ग्रामपंचायत सदस्य, काका चव्हाण, विठ्ठल सोंडे, बाबा चव्हाण, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक रमेश भुजबळ, माजी उपसरपंच दिलीप वाबळे, बाळासाहेब वाबळे, वाबळेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य काळूराम साईराम वाबळे, बापूसाहेब सुदाम वाबळे, भरत कैलास वाबळे, महेश मासळकर, अमित राऊत, शिक्रापूर सोसायटीचे अध्यक्ष अनिल राऊत उपाध्यक्ष बाळासाहेब राऊत, सुनील भुमकर, संदीप गायकवाड, गणेश पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब करंजे, उपाध्यक्ष विलास भालके आदी उपस्थित होते.

शिक्रापुरात येऊन शिक्षण मंत्र्यांनी फिरवली वाबळेवाडीकडे पाठ

वाबळेवाडीच्या धर्तीवर आदर्श पऱ्हाडवाडी शाळा