waghale-birthday

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

वाघाळे (संतोष धायबर): शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा १ जून रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. महिलांनी औक्षण करून केक कापत अभुतपूर्व सामूहिक वाढदिवस उत्साहात साजरा केला. गावामधील अनेकांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर सर्वांचाच आनंद व्दिगुणित झाला होता.

वाघाळे गावातील कलासागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार थोरात, मा. उपसरपंच दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते संदिप धायबर यांच्यासह युवकांनी पुढाकार घेवून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. एक जून रोजी गावातील ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांना एकत्र करून सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा सोहळा सुरू केला. खरेदी-विक्री संघाचे संचालक लहू थोरात यांच्या निवासस्थानी सर्वांचे वाढदिवस असलेल्या व्यक्तींना एकत्रित आमंत्रित करण्यात आले होते. दिलीप थोरात यांनी सर्वांना महाराष्ट्रीयन फेटे बांधले तर महिलांनी माथ्यावर गंध, अक्षदा टाकत औक्षण केले आणि त्यानंतर एकचा वेळी केक कापत शुभेच्छा देत मोठा जल्लोष करण्यात आला.

माजी शिक्षक मारुती थोरात, वामन शेळके यांनी एक जून ही वाढदिवसाची तारीख कशी देण्यात आली हे सांगितले. दिलीप थोरात, संदिप धायबर, संतोष गोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. खरेदी-विक्री संघाचे संचालक लहू थोरात, ओंकार थोरात यांनी आभार मानले तर गावातील अनेक युवकांनी मान्यवरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

१जून आणि वाढदिवस…
1972 च्या आधी जन्म झालेल्या जुन्या पिढीतील अनेक लोकांना आपली जन्मतारीख माहित नव्हती. शिवाय जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. शाळेत नाव नोंदवताना जन्म तारखेची फारशी आवश्यकता नव्हती. मात्र, शाळेत घालण्यासाठी वयाची अट होती. ही अट पूर्ण करण्याचा कालावधी जूनपासून मोजला जात असे. त्यामुळे, सोयीचे म्हणून बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 जून नोंदवत असत. महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच निमशहरी भागातील शाळा या 1 जूनला उघडत. त्या दिवशी जेवढी मुले शाळेत येत. तेवढ्या मुलांचा जन्मदिवस शिक्षक मंडळी 1 जून नोंदवत. त्यामुळे अनेकांचा वाढदिवस 1 जूनला येतो, असेही म्हटले जाते.

भारतामधील शैक्षणिक वर्षाच्या रचनेचा मुलांना पुढील वर्गात दाखला देता येतो. त्यामुळे शालेय दाखल्यावर हीच तारीख असल्याने तो जन्माचा पुरावा म्हणून पुढे सगळीकडे वापरला जातो. त्याच अनुषंगाने अशा मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख ही’ऑन पेपर’ तरी 1 जूनच हीच असते.

शेवटची पिढी…
राज्यात १ जुन ही शासकीय जन्म तारीख समजली जाते. त्यानुसार अनेक जण या दिवशी आपला खरा किंवा खोटा वाढदिवस साजरा करताना दिसतात. १ जून जन्मतारीख असलेल्या नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. १ जून ही जन्मतारीख असलेली कदाचित ही शेवटची पिढी असेल

“जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे…!” असं प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपल्या लाडक्या पुलंचं एक वाक्य आहे. आता या वाक्यातून तुम्हाला 1 जूनला ढीगाने वाढदिवस का असतात हे समजलं असेलच. 1 जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा हा ‘ऑन पेपर बर्थ डे’ आहे. 40 ते 45 वर्षांपूर्वीपर्यंत सध्या बंधनकारक करण्यात आलं आहे त्याप्रमाणे जन्म-मृत्यूची नोंद ठेवण्याचा प्रकार अस्तित्वातच नव्हता. त्यामुळे जन्माचा दाखला वगैरे प्रकाराला फारसं महत्त्व नव्हतं. तसेच पूर्वीच्या काळी बहुतांश महिलांची प्रसुती ही सुईणींच्या मदतीने घरच्या घरीच व्हायची. त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयांमध्ये नोंद असेलच असंही काही नव्हतं. आता अशा जन्मतारखेची नोंद नसणाऱ्या मुलांना शाळेत दाखला घेताना त्यांची जन्मतारीख विचारली जायची. त्यावेळेस फारसं शिक्षण नसल्याने अनेक आई-वडील मास्तरांना काय सोयीचं पडेल असं विचारायचे. त्यानुसार मास्तरही 1 जूनला जन्म झाला अशी नोंद करुन घ्यायचे.

रिटायरमेंटशीही खास कनेक्शन…
या तारखेला सरकारी वाढदिवस असेही म्हणतात. सरकारी नियमांप्रमाणे निवृत्तीला आलेली व्यक्ती वयोमर्यादेनुसार वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होते. आता वरील सर्व कारणांचा विचार केल्यास 1 जूनला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. 1 जूनला वयाची 60 वर्ष पूर्ण करणारे अनेक सरकारी कर्मचारी 31 मे रोजी निवृत्त होतात.

एन.एम.एम.एस. परीक्षेत कालिकामाता विद्यालय वाघाळेचे घवघवीत यश!

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न…

वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…

वाघाळे गावातून वाघेश्वर दिंडीचे भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान…

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!