मंगलदास बांदलांनी भागवली जुन्नर तालुक्यातील गावांची तहान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल हे त्यांच्या विविध कार्यामुळे नेहमीच चर्चेत येत असताना आता त्यांनी थेट जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील सांसद आदर्श ग्राम योजनेतील काही गावांची तहान स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरु करुन भागवली असल्याने मंगलदास बांदल यांच्या कार्याची चांगलीच चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर तालुक्यातील मुथाळणे, मांडवे, जांभूळशी, कोपरे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना काही केल्या सदर प्रश्न सुटलेला नाही. मात्र जुन्नर तालुक्यातील कोपरे – मांडवे हे गाव खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी दत्तक घेतलेले असताना देखील येथील पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटला नसताना गावातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे काही ग्रामस्थांनी युवा नेते निखील बांदल यांना सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या माध्यमातून मुथाळणे, मांडवे, जांभूळशी, कोपरे या चार गावातील सर्व वाड्या वस्त्यांवर पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले असल्याने या गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा कार मधील व्हिडिओ प्रसारित करत या गावांचा समावेश सांसद आदर्शग्राम योजनेत असला तर त्यासाठी काही निधीची तरतूद नसते, असे सांगत या गावांच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न सुरु असून काही अडचणी येत असल्याबाबतचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. मात्र मंगलदास बादल यांनी जुन्नर तालुक्यातील या गावांना पाणी पुरवठा करत आपल्या कार्याची छाप नागरिकांमध्ये निर्माण केली आहे.

शिरुर तालुक्यातील घटनेची आठवण…

काही वर्षापूर्वी शिरुर तालुक्यातील एका गावामध्ये सकाळच्या सुमारास मंगलदास बांदल दशक्रिया विधीसाठी गेलेले असताना त्यांना काही महिला पाण्यासाठी काही अंतर पायपीट करत असल्याचे दिसले असता त्यांनी तातडीने सदर ठिकाणी लक्ष केंद्रित करत महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवला असल्याचे सदर घटनेची आठवण देखील शिरुर करांना झाली आहे.

गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार;  मंगलदास बांदल

जुन्नर तालुक्यातील सदर गावांमध्ये अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर असून कोणीही सदर समस्या सोडवू शकले नाही. मात्र याबाबत आपण पुढाकार घेऊन सध्याची उपाययोजना केलेली असून पुढील काळात सदर गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवणार असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.