माथाडीच्या नावाखाली “खंडणी” वसुल करणारा खरा सूत्रधार अजुनही मोकाट…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

भीम बटालियनच्या संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड आम्रपाली धिवार यांचा आरोप

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC त माथाडी च्या नावाखाली बोगस पावत्या देऊन “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर सोमवार (दि 6) रोजी रांजणगाव MIDC पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. परंतु हे फक्त प्यादे आहेत. या प्रकरणातला खरा सूत्रधार जामिल स्टील कंपनीचा व्यवस्थापक राहुल भागवत आणि “जय मल्हार इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस” चा सर्वेसर्वा मल्हारी मलगुंडे यांना रांजणगाव पोलिस कधी अटक करणार असा सवाल भीम बटालियनच्या संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड आम्रपाली धिवार यांनी केला आहे.

“शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना अ‍ॅड आम्रपाली धिवार म्हणाल्या, रांजणगाव MIDC त टाटा स्टील आणि जामिल स्टील या कंपनीच्या बाहेर जय मल्हार इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस च्या नावाने ट्रक चालकांना माथाडीच्या बोगस पावत्या देऊन “खंडणी” वसुल केली जाते. याचा मी स्वतः रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी रांजणगाव, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालय, पाषाण, अप्पर कामगार आयुक्तालय, पुणे या ठिकाणी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला आहे. तसेच सहायक कामगार आयुक्त हेच माथाडी बोर्डाचे अध्यक्ष असतात त्यांच्याकडेही याबाबत लेखी पाठपुरावा केला.

त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, माथाडीचे निरीक्षक मते यांच्यासोबत आमची एक बैठक झाली. त्यानंतर मते यांच्याकडे आम्ही माथाडीच्या नावाखाली फाडलेल्या पावत्या सादर केल्यानंतर त्या “बोगस” असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन मते यांनी दिले होते. तसेच जामिल स्टील कंपनीत काशिनाथ चंदरराव पाचंगे यांच्या शिवाय कोणताही माथाडी कामगार हा अधिकृत रजिस्टर नसताना कंपनीचे व्यवस्थापक राहुल भागवत यांनी माथाडी बोर्डाकडुन 20 पावती पुस्तके का…? मागवून घेतली. त्यानंतर त्यांनी त्यातली 12 पावती पुस्तके माथाडी बोर्डाला परत दिली. परंतु अजुनही 8 पावती पुस्तक त्यांच्याकडेच असुन माथाडी बोर्डाने त्यांना याबाबत नोटीस काढुन ती 8 पावती पुस्तके कुठं गेली…? अशी विचारणा केली आहे.

तसेच जामिल स्टील या कंपनीमध्ये मल्हारी मलगुंडे यांची “जय मल्हार इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस” हि माथाडी रजिस्टर नाही. तसा कागदोपत्री पुरावा माथाडी बोर्डाने आम्हाला दिलेला आहे. तसेच अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे यांनी त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तोंडी आदेश देऊनही मुख्य सूत्रधार राहुल भागवत आणि मल्हारी मलगुंडे यांच्यावर गुन्हा दाखल का…? होत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असुन रांजणगाव पोलिसांना मुख्य सूत्रधाराला अटक करण्याचा पुर्ण अधिकार असताना पोलिस जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.