ओव्याचे औषधी गुणधर्म

आरोग्य

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो. पराठे, खारी शंकरपाळे, पुरी इत्यादी मध्ये याचा वापर करतात. अचानकपणे पोटात मुरडा आला किंवा पोट दुखू लागलं तर घरातील गृहिणी पटकन थोडासा ओवा खायला देते. ओवा खाल्ल्यामुळे पोटदुखी बरी होते असं म्हटलं जातं.

एखादा डाळीच्या पिठापासून पदार्थ तयार करायचा असेल तर त्यात चिमुटभर ओवा घालतात. त्यामुळे पोटात गॅस धरत नाही. परंतु, ओवा खाल्ल्यामुळे केवळ पोटदुखीच कमी होते असं नाही. ओवा खाण्याचे अन्यही काही फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ओवा खाण्याचे काही गुणकारी फायदे.

पोट दुखणे, शौचास न होणे किंवा पोट फुगणे या तक्रारींमध्ये चिमुटभर ओवा आणि थोडसं सैंधव मीठ एकत्र करुन खावे. वारंवार लघवीला होत असल्यास गूळ आणि ओवाचूर्ण समप्रमाणात घेऊन त्याची लहानशा गोळ्या कराव्यात. या गोळ्या चार-चार तासांनी खाव्यात. पोटात आग होत असल्यास किंवा जळजळत असल्यास ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध एकत्र करुन खावं. लहान मुलांचे पोट दुखत असेल तर ‘ओवा अर्क’ बेंबी भोवती गोलाकार चोळून पोट शेकवावे. ओवा खाल्ल्यानंतर कायम पाणी प्यावे. कारण ओवा उष्ण असल्यामुळे बऱ्यात वेळा तोंड येण्याची शक्यता असते. अनेक वेळा दूध पचायला जड जातं. काहींना दूध प्यायल्यावर त्रास होतो. अशांनी दूध प्यायल्यावर चिमूटभर ओवा चावून खावा. अनेक वेळा लहान मुलांनी अंथरुणात लघवी करण्याची सवय असते. अशा वेळी किंचितसा ओवा गुळासोबत मुलांना खायला द्यावा.

पानांची भाजी

साहित्य: ओवा पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर

कृती: एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावे. नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे. नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे. नंतर त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.

(सोशल मीडियावरुन साभार)