Kiran Shinde

एक यशस्वी उद्योजक: किरण शिंदे…

मुलाखत

शिरूर तालुक्याची साधारण 25-30 वर्षांपूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील नागरिकांना दोन वेळचे अन्नही साधे मिळत नव्हते… असो. पण आता तालुक्याची ओळख बदलली आहे. शिरूर तालुका आता उद्योगनगरी म्हणून ओळखू लागला आहे. या उद्योग नगरीमध्ये अनेक मराठी उद्योजक उदयास आले आहेत. त्यामध्ये पुणे-नगर रस्त्यावरील रांजणगाव गणपती येथील मातोश्री हॉटेलचे मालक किरण शिंदे यांचे नाव नक्कीच पुढे येते….

मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे… शिवाजी जन्मावा पण दुसऱयाच्या घरात… अशी वाक्ये नेहमी आपल्या कानावर पडतात. मराठी माणूस म्हटला की, व्यवसायापेक्षा नोकरीकडेच वळताना दिसतो. पण, किरण शिंदे यांनी अगदी लहानपणीच व्यवसायच करायचा याचा मनाशी निश्चय बाळगलेला… जिद्द, चिकाटीतून व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये ते यशस्वीही झाले. किरण शिंदे यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांची जिद्द पाहिल्यानंतर खरोखरच मराठी माणूस काय करू शकत नाही, हे पाहायला मिळते… कष्ट आणि चिकाटीमधून त्यांनी ते दाखवून दिले आहे.

वडील कायमचे निघून गेले…
किरण शिंदे यांचे गाव शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती. शिंदे कुटुंबाचे रस्त्याच्या कडेला घर. पण, एक ट्रक आला आणि वडिलांच्या अंगावरून गेला. या अपघातात किरण शिंदे यांच्या वडिलांचे निधन झाले. बापू, किरण, बहिण आणि आईला सोडून वडील कायमचे निघून गेले… मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण, आईने जिद्द बाळगली आणि तिन्ही मुलांना मोठे करण्याचा ध्यास घेतला. मुलांना घेऊन आई माहेरी गेली. दिवस पुढे सरकत होते. पण, आर्थिक परिस्थिती अतिषय बिकट होती. आईने मुलांना लहाणाचे मोठे करण्यासाठी वाळूचे ट्रक भरले. वाळूचे ट्रक भरणे हे अतिशय मेहनती काम… पण, आईने मुलांना मोठे करण्यासाठी अहोरात्र काम केले…

उद्याचा उद्योजक घडू पाहात होता…
आईने माहेरी काही वर्षे काढल्यानंतर पुन्हा रांजणगावला सासरी येण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित दोन-अडीच एकर जमीन वाट्याला आलेली. स्वतःच्या जमीनीत काबाडकष्ट करून पिकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेतामध्येच एक कोपी उभी केली. या कोपीमध्येच आई आपल्या तिन्ही मुलांना जवळ घेऊन राहायची… रात्रं-दिवस कष्ट करून चौघे झोपडीत राहात होते. अन्न-धान्य पिकवत होते. मुलांना दुध मिळण्यासाठी म्हशी घेतल्या होत्या. कुटुंबासाठी ठेवून उर्वरित विकायचे… अशा गरिब परिस्थितीत दिवस पुढे जात होते. काही दिवसानंतर कोपीनंतर पत्र्याचे घर उभारायचे ठरवले. दगड, माती गोळा केली आणि पत्र्याचे साधे घर उभारले. पण, पाऊस आला की घरांच्या भिंतीमधून पाणी आत येई. एकदा तर जोराचा पाऊस आणि वाऱयामुळे घराचा पत्रा पडला… थोडक्यात सर्वजण बचावले…. पण, या गरिबीमधूनच उद्याचा उद्योजक घडू पाहात होता.

शिक्षणापेक्षा व्यवसायाकडे ओढा…
किरण यांचे शिक्षणापेक्षा उद्योगाकडेच जास्त लक्ष… कारण, परिस्थितीच त्यांना उद्योजक बनवत होती. घरी म्हशी असल्यामुळे किरण हे नेहमी दुधावरच राहायचे… शेळ्यांचे दुध पिऊन शरिरयष्टी अगदी मजबूत बनत चालली होती. शिक्षणापेक्षा त्यांचा ओढा नेहमी व्यवसायाकडेच होता… कारण, परिस्थितीने त्यांना अगदी लहान वयात खूप काही शिकवले होते. लहान असतानाच डोक्यावर पाटी घेऊन ते भाजीपाला घेऊन विक्रीसाठी जात. मोठ-मोठी पोती उचलत. अनेकांना भाज्या फेकून द्याव्या लागत. पण, ते नफा मिळवायचेच… ते पण विद्यार्थी दशेत असतानाच…. एक आठवण सांगतात, ‘भाजीपाला विकायला जायचो. पण, पुर्वी टेम्पोमधून केळीची मोठी विक्री केली जायची. टेम्पोवर गर्दी होत असे आणि केळी विकणाऱयाचा गल्ला गच्च भरलेला दिसायचा… त्याच्याकडे एवढे पैसे पाहिल्यानंतर आपणही असे मिळवू शकतो का? असा प्रश्न पडायचा… आणि मिळवायचेच असा निश्चय बाळगायचो. भाजी-पाल्यातून, पेरू विकून, दूधाची विक्री करून थोडे-थोडे पैसे मिळवू लागलो….’

व्यवसायाला सुरवात…
शिक्षण सुरू असतानाच उद्योग-व्यवसायाकडे पावले वळली होती… व्यवसायाचे ज्ञान अवगत झाले होते. नफा कसा मिळवायचा हे परिस्थितीने शिकवले होते. दहावीपर्यंत शिक्षण झाले… पुढे काय… हा प्रश्न होताच. पण, नोकरी नव्हे तर व्यवसायच करायचा हे अगोदरच ठरवले होते. गावामध्ये किराणा दुकान सुरू केले. किराणा मालाची कसलीही माहिती नव्हती. पण, व्यवसायात उडी घेतली होती. माणूस पाण्यात पडला की पोहायला शिकतो, अगदी त्याप्रमाणेच ते शिकत होते. हळूहळू माहिती होत होती. किराणा मालाची मोठमोठी पोती येत… पण, हमाली द्यायला नको.. म्हणून ते स्वःत पोती उतरवत. कारण, काबाडकष्ट करून, दुध पिऊन तब्बेत चांगली होती. अगदी शंभर किलोचे पोते सहज उचलायचो… यामागे उद्देश होता की, पैशांची बचत…, असे किरण शिंदे सांगतात.

हॉटेल व्यवसायात पदार्पण…
किराणा दुकानात चांगला जम बसला होता. नफा तर मिळतच होता. पण, पुढे काय? किराणा दुकानावर न थांबता नव्याने दुसरा व्यवसाय केला पाहिजे, हा विचार शांत बसवू देत नव्हता. हॉटेल व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला… पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव जवळ एक ढाबा सुरू केला. हा व्यवसाय पण नवीनच. पण, व्यवसायाचे आर्थिक गणित माहित झाले होते. हळू-हळू या व्यवसायामध्येही चांगला जम बसला आणि आर्थिक परिस्थिती चांगलीच सुधारली. बहिणीचे लग्न झाले… भावाने उद्योग-व्यवसायात उडी घेतली आणि दिवस झपाट्याने बदलले…

मातोश्री हॉटेल…
ढाब्याचे रुपांतर मोठ्या हॉटेलमध्ये झाले. ते हॉटेल म्हणजे ‘मातोश्री हॉटेल’. आज या हॉटेलमध्ये 100 हून अधिक कामगार काम करत आहेत. व्यवसायातून मोठी आर्थिक प्रगती झाली… यानंतर मोठ्या प्रमाणात शेतीही विकत घेतली. पण, हे सर्व जिद्दीच्या जोरावर… शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. एक वेळ अशी होती की, पैसे पाहायला मिळत नव्हते… पण आज परिस्थिती अशी आहे की पैसे मोजण्यासाठी मशिनची आवश्यकता लागते. पण, हे एका रात्रीत शक्य नाही. यामागे खूप कष्ट घ्यावे लागलेत. आईने अक्षरशः रक्ताचे पाणी करून आम्हाला लहानाचे मोठे केले. म्हणूनच हॉटेलचे नाव आहे, मातोश्री हॉटेल….

आपुलकी, प्रेम, जिव्हाळा…
पुणे-नगर रस्त्यावरील मातोश्री हॉटेल हे मोठे हॉटेल. ग्राहकांची येथे नेहमी मोठी गर्दी पाहायला मिळते. यामागचे कारण म्हणजे… आपुलकी, प्रेम, जिव्हाळा. येथे आलेला ग्राहक हा दोन घास घेतल्यानंतर चांगले आशिर्वाद देऊनच बाहेर पडलाच पाहिजे… भूक काय असते हे अनुभवले आहे. यामुळे फक्त पैसे कमावणे हा उद्देश नाही तर ग्राहकांचे समाधान झाले पाहिजे…. व्यवसाय तर आहेच पण दुसऱयांना खाऊ घालण्याचे खूप मोठे समाधान आणि भाग्य असते… ते भाग्य मिळवायलाही नशिब लागते. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण पायी जात होते… हजारो, लाखो नागरिकांना खायला देण्याचे भाग्य आम्हाला लाभले. दुसऱयाला खाऊ घातल्याने काही कमी पडत नाही. उलट उद्योग-व्यवसायात वाढतच होत आहे, असेही किरण शिंदे सांगतात.

KKS KITCHEN…
लॉकडाऊन हे व्यवसायांना अडचण नव्हे, मराठी व्यवसायिकांना संधीच आहे. हे माझ्या लक्षात आले. मग ज्या कामाचा अनुभव आहे, तेच काम वाढवायचे असे ठरवूनच पुण्यामध्ये सर्वात जास्त डेवलपमेंट असलेला भाग कोणता तर वाघोली. मग वाघोली परिसरामध्ये एक चांगल्या रेस्टॉरंटची गरज ओळखून KKS KITCHEN फॅमिली रेस्टॉरंट सुरू केले. या रेस्टॉरंटचे दुसऱया तिसऱया कोणाच्या नव्हे तर आईच्या हस्ते उद्घाटन केले. उद्घाटनाची फित कापताना आईच्या चेहऱयावर केवढे समाधान होते. KKS KITCHEN ने खवय्यांचा मनात एक स्थान निर्माण केले आहे. अपेक्षे पेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. केकेएसने प्रमाणेच जेवणाच्या बाबतीत देखील एक स्वतःचा अस्तित्व आणि आपली एक वेगळीच चव खवय्यांचा जिभेवर कायमची मुरवली आहे.

भाऊ…
मोठ्या भावाचे नाव बाप्पू. भावाने कुटुंबाची जबाबदारी ओळखून वडिलांची भूमिका निभावली. घरामध्ये मोठा असल्यामुळे आपोआपच जबाबदाऱया आल्या… शिवाय, त्या खंबीरपणे पेलल्याही. खरे ते खरे आणि खोटे ते खोटे… अशी स्पष्ट भूमिका असणारा भाऊ कायम खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. एक भाऊ, मित्र म्हणून खूप मोठ्या मनाचा आहे. भाऊ शिवसेनेचा पदाधिकारी आणि मी व्यवसायात. आम्ही दोघे दोन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहोत.

माझ्यासारख्या युवकाच्या मागे कुठलाही आर्थिक पाठबळ नसताना आज मी येथवर पोहचलो आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, कोकणात हॉटेल सुरू करायची आहेत. त्याची चव खवय्यांपर्यंत घेऊन जायची आहे, असेही किरण शिंदे सांगतात. खरंच, किरण शिंदे यांनी अगदी कमी वयात व्यवसायात मोठी झेप घेतली आहे. मराठी माणूस काय करू शकत नाही… युवक काय करू शकत नाही, याचा आदर्श त्यांनी युवकांना घालून दिला आहे. ठरवले तर काहीही शक्य नाही. फक्त त्यामध्ये जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा हवा… मग, यश मिळतेच… हे किरण शिंदे यांनी अनुभवातून दाखवून दिले आहे. त्यांच्या जिद्दीला www.shirurtaluka.com चा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा….

– संतोष धायबर
santosh.dhaybar@gmail.com